एबी डिव्हिलियर्सला म्हणून लवकर घ्यावी लागली निवृत्ती, इतक्या वर्षांनी केला खुलासा
AB de Villiers याने खुप लवकर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्काच होता. पण इतक्या वर्षाने त्याने निवृत्तीबाबत खुलासा केला आहे. एबी डिव्हिलियर्सला खेळताना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आवर्जून सामना पाहायचे. काय होतं कारण ज्यामुळे त्याने लवकर निवृत्ती घेतली.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स हा दिग्गज खेळाडू जेव्हा मैदानावर असायचा तेव्हा गोलंदांना घाम फोडायचा. 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास त्याने सुरुवात केली. डिव्हिलियर्सने 114 कसोटी, 228 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एकूण 20,014 धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) साठी खेळायचा. डिव्हिलियर्स ‘मिस्टर 360’ म्हणून ओळखला जातो. पण त्याने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि 2021 मध्ये त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली.
विस्डेन क्रिकेटशी नुकत्याच झालेल्या संभाषणात डिव्हिलियर्सने डोळ्याच्या दुखापतीने त्याची कारकीर्द कशी संपली हे उघड केले. या दुखापतीमुळे त्याच्या दृष्टीवर परिणाम झाला. त्याने सांगितले की त्यांच्या मुलाने त्यांच्या डोळ्यावर चुकून लाथ मारली होती, त्यामुळे त्याला पाहण्यास त्रास होऊ लागला. दिसायला त्रास होत असतानाही तो 2 वर्षे क्रिकेट खेळला, पण डोळ्यावर उपचार केल्यानंतर मैदानात उतरू शकला नाही.
डिव्हिलियर्स म्हणाला की, “माझ्या मुलाने चुकून माझ्या डोळ्यात लाथ मारली. यानंतर माझ्या उजव्या डोळ्यातील दृष्टी कमी होऊ लागली. माझी शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टरांनी मला विचारले की तू असे क्रिकेट कसे खेळतोस? माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या दोन वर्षांत सुदैवाने माझा डावा डोळा चांगला काम करत होता.”
2018 मध्ये सर्व गोष्टींपासून दूर गेलो
एबीडी म्हणाला की, “मला अनेकदा प्रश्न पडतो की माझ्या करिअरचा शेवट असा असू शकतो का? आयपीएल किंवा इतर कोणतीही सीरीज मला खेळायची नव्हती. पण मला 2018 मध्ये मला या गोष्टींमधून ब्रेक घ्यावा लागला. कसोटी क्रिकेटमध्ये मी भारत आणि ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा प्रयत्न करुन नंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मला माझ्यावर कोणताही स्पॉटलाइट नको होता. पण माझा वेळ खूप छान होता, खूप खूप धन्यवाद.’