AFG vs AUS: सेमीफायनलम्ध्ये पोहोचताच अफगाणिस्तानच्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनला असं डिवचलं
T20 विश्वचषक 2024 मधील सुपर 8 टप्प्यातील अंतिम सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत गेल्याने ऑस्ट्रेलियन संघ या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. यानंतर अफगाणिस्तानच्या एका खेळाडूने ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनला डिवचलं आहे.
Afghanistan vs Australia: बांगलादेशचा पराभव करत अफगाणिस्तानचा संघ T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पहिल्यांदाच आयसीसीच्या कोणत्या स्पर्धेत अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचं आव्हान संपुष्टात आले आहे. अफगाणिस्तानच्या या ऐतिहासिक विजयाची क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा आहे. या विजयानंतर अफगाणिस्तानचे लोक रस्त्यावर उतरून जल्लोष करताना दिसले. या सेलिब्रेशनचे फोटो अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर शेअर केले आहेत.
पॅट कमिन्सची खिल्ली उडवली
अफगाणिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज नजीबुल्लाह याने X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टद्वारे ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सची खिल्ली उडवली. तर दुसरीकडे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खानने इंस्टाग्रामवर रोहित शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये राशिद खानने लिहिले की, ‘बम्बई से आया मेरा दोस्त. सेमीफायनल.’ राशिद खानची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. तासाभरात याला 5.25 लाखांहून अधिक लाईक्स आणि 18 हजार कमेंट्स मिळाल्या आहेत.
T20 विश्वचषक 2024 मधील सुपर 8 टप्प्यातील शेवटच्या सामन्यानंतर नजीबुल्लाह झद्रानने X वर लिहिले, ‘प्रश्न: शीर्ष 4 उपांत्य फेरीचे खेळाडू कोण आहेत? उत्तर: निश्चितपणे एक ऑस्ट्रेलिया, इतर 3 तुम्ही निवडा.’
Q :How is the top 4 semi finalist?
A : definitely Australia other 3 you choose ✈️✈️✈️ 🤫🤐 @ACBofficials @patcummins30 @CricketAus
— Najib Zadran (@iamnajibzadran) June 25, 2024
नजीबुल्लाची ही पोस्ट सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे. यावर ४ तासात जवळपास ५० हजार लाईक्स आले होते. त्याच वेळी, दीड हजारांहून अधिक कमेंट्स आणि 6.5 हजारांहून अधिक पोस्ट्स आल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाला डिवचलं
T20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यापूर्वी पॅट कमिन्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये, अँकरला पॅट कमिन्सकडून T20 विश्वचषक 2024 च्या चार संभाव्य उपांत्य फेरीतील खेळाडूंची नावे जाणून घ्यायची होती. यावर पॅट कमिन्स म्हणाले होते की एक ऑस्ट्रेलिया आहे. जेव्हा अँकरने इतर तीन संघांची नावे देण्याचा आग्रह धरला तेव्हा पॅट कमिन्स म्हणाले की तुम्ही स्वतःच इतर तीन संघांची निवड करा. त्यावरुन ही खिल्ली उडवली जात आहे.