Asia cup 2022: 6 Six, 253 चा स्ट्राइक रेट, 17 चेंडू…. त्याने 25 मिनिटात संपवला T20I सामना
Asia cup 2022: T20 क्रिकेट (T20 Cricket) मध्ये चौकार, षटकारांमुळे खरी रंगत येते. फलंदाजाने मैदानात फटक्यांची आतषबाजी सुरु केल्यानंतर मॅच पहाण्याची एक वेगळीच मजा असते.
मुंबई: T20 क्रिकेट (T20 Cricket) मध्ये चौकार, षटकारांमुळे खरी रंगत येते. फलंदाजाने मैदानात फटक्यांची आतषबाजी सुरु केल्यानंतर मॅच पहाण्याची एक वेगळीच मजा असते. सध्या आशिया कप (Asia cup) स्पर्धा टी 20 फॉर्मेट मध्ये सुरु आहे. त्यामुळे या स्पर्धेतला रोमांच, उत्साह अधिक वाढला आहे. काल अफगाणिस्तान आणि बांगलादेश (AFG vs BAN) मध्ये सामना झाला. या लढतीत कागदावर बांगलादेशचा संघ बलाढ्या वाटत होता. अफगाणिस्तानच्या तुलनेत त्यांच्याकडे अनुभव सुद्धा जास्त आहे. पण अफगाणिस्तानने या स्पर्धेत दुसऱ्या धक्कादायक निकालाची नोंद केली. अफगाणिस्तानच्या सलग दुसऱ्या विजयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी बलाढ्य श्रीलंकेला नमवलं होतं. आता बांगलादेशला हरवलं. बांगलादेशवरील अफगाणिस्तानच्या विजयाचा नायक ठरला, नजीबुल्लाह जादरान. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने बांगलादेशच विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं.
धावफलकावर 50 धावाही नव्हत्या, त्यावेळी….
आशिया कपच्या सुपर 4 ग्रुप मध्ये प्रवेश करणारा अफगाणिस्तान पहिला संघ ठरला आहे. नजीबुल्लाह जादरानने अवघ्या 25 मिनिटात सामन्याचा निकाल लावला. नजीबुल्लाहने अवघ्या 25 मिनिटात असं काय केलं, ते समजून घ्या. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 127 धावा केल्या. 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ थोडा अडचणीत सापडला होता. 10 षटकात अफगाणिस्तानच्या 2 विकेट गेल्या होत्या. धावफलकावर 50 धावाही नव्हत्या. रनरेटही 6 च्या खाली होता.
25 मिनिटात बाजी उलटवली
नजीबुल्लाह जादरान फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा अफगाणिस्तानची स्थिती चांगली नव्हती. पण बाजी उलटायला फार वेळ लागला नाही. बांगलादेशच्या डोळ्यासमोर ते जिंकणारा सामना हरले. याच एकमेव कारण नजीबुल्लाह जादरान. 25 मिनिट नजीबुल्लाह क्रीजवर होता. त्याने अवघ्या 17 चेंडूत नाबाद 43 धावा फटकावल्या. त्याने 6 षटकार आणि एक चौकार मारला. नजीबुल्लाहने इब्राहिम जादरान सोबत नाबाद राहत विजयावर शिक्कामोर्तब केलं.