Rishabh Pant Accident : कार पलटली, खांब तोडले, पेटही घेतला, त्यानंतर ऋषभ पंतने काय केलं? उगाच नाही वाचला जीव
ऋषभ पंतचा प्रचंड भीषण अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर त्याला कोणीही वाचवायला आलं नाही. केवळ प्रसंगावधान राखल्यामुळे पंत स्वत:चा जीव वाचवू शकला.
डेहराडून: भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत कार अपघातातून थोडक्यात बचावला. अत्यंत भीषण अपघात होऊनही दैव बलवत्तर म्हणून ऋषभ बचावला. दिल्ली-डेहराडून हायवेवर पंतची कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर या कारने खांबाला धडक दिली आणि रस्त्यावरच कार पलटी झाली. त्यानंतर अचानक कारने धडाधड पेट घेतला. मात्र, त्यानंतरही पंत बचावला. पंतला मार लागला आहे. पण त्याचा जीव वाचला हे महत्त्वाचं. परंतु, पंतचा जीव वाचला कसा? त्याला कोणी मदत केली? अपघातानंतर लगेच काय झालं? असे सवाल केले जात आहेत. अन् त्याची उत्तरेही तितकीच थक्क करणारी आहेत.
ऋषभ पंतचा प्रचंड भीषण अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर त्याला कोणीही वाचवायला आलं नाही. केवळ प्रसंगावधान राखल्यामुळे पंत स्वत:चा जीव वाचवू शकला. कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कारने खांबाला धडक अन् कार पलटी झाली.
त्यानंतर अचानक कारने पेट घेतला. एवढं होऊनही पंत घाबरला नाही. बिथरला नाही. तसेच त्याने हातपायही गाळले नाहीत. त्याने स्वत:ला वाचण्यासाठी जे केलं ते भले भलेही करत नाहीत.
कारच्या काचा तोडल्या म्हणून…
मिळालेल्या माहितीनुसार, पंतने तात्काळ कारच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर तो त्या खिडक्यातून बाहेर आला. बाहेर येताना त्याच्या पाठीला काचा लागल्या. रक्त येत होतं. पण तो तरीही त्याने माघार घेतली नाही. कारच्या खिडकीतून बाहेर आलो नाही तर कार सोबत आपणही जळून राख होऊ हे त्याच्या एव्हाना ध्यानात आलं होतं. म्हणूनच त्याने कारच्या तोडल्याने त्याचा जीव वाचला.
क्रिकेटपटू ऋषभ पंतचा पहाटे भीषण अपघात झाला. या अपघतात ऋषभ गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.#Rishabpant #Rishabpantaccident #accident #IndianCricketer #TeamIndia pic.twitter.com/kwP57lghYD
— BhimRao Gawali (@BhimraoGawali) December 30, 2022
अन् डोळ्यादेखत कार जळून खाक
पण जेव्हा पंत कारच्या बाहेर पडला, तेव्हा कारने अधिकच पेट घेतला होता. आणि काही क्षणातच त्याच्या डोळ्यादेखत कारचा जळून कोळसा झाला. हे दृश्य पाहून पंतच्या काळजातही धस्स झालं. जर या अपघातात तो बेशुद्ध झाला असता तर काय झालं असतं याचा विचार न केलेला बरा.
डुलकी लागली अन्…
पंतने या अपघाताची स्वत: माहिती दिली आहे. त्याने अपघाताचं खापर कुणावरही फोडलेलं नाही. उलट अपघात आपल्यामुळेच झाल्याचं त्याने सांगितलं. पहाटेची वेळ होती. थोडी डुलकी लागली अन् कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार डिव्हाडरला धडकली. त्यानंतर खांबावर जाऊन कोसळली अन् कार पलटी झाल्याचं त्याने सांगितलं.
पायाला फ्रॅक्चर
अपघातानंतर स्थानिकांनी पंतला रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. त्याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला मार लागला आहे. त्याच्या पाठीवरही प्रचंड मार लागला असून त्याची पाठ रक्ताळलेली आहे. त्याच्या पायात फ्रॅक्चर झालं असल्याचं सांगितलं जात आहे.
सामन्याला मुकणार
पंतला बरे होण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार आहेत. या दुर्घटनेनंतर ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या टेस्ट सीरीजमध्ये तो खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे.