दिनेश कार्तिक नंतर आता हा खेळाडू क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता
भारताचा क्रिकेटर दिनेश कार्तिक याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आरसीबीच्या शेवटच्या सामन्यात पराभवानंतर त्याने देखील थांबण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता आणखी एक खेळाडू निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
दिनेश कार्तिक याने निवृत्ती घेतली आहे. त्याने आपल्या खेळीने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दिनेश कार्तिक अनेकदा टीमसाठी उत्तम खेळाडू ठरला आहे. पण आता शिखर धवन देखील निवृत्तीबाबत घोषणा करु शकतो असा दावा केला जात आहे. दिनेश कार्तिकच्या निवृत्तीनंतर शिखर धवन लवकरच क्रिकेटला अलविदा करणार असल्याचे मानले जात होते. पण शिखर धवन खरंच क्रिकेटला अलविदा करणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर खुद्द शिखर धवनने दिले आहे. शिखर धवन म्हणाला की, कदाचित तो येत्या काही वर्षांत निवृत्ती घेईल. म्हणजेच सध्या तरी तो निवृत्ती घेण्याच्या विचारात नसल्याचं दिसतंय.
शिखर धवन म्हणाला की, मी आता एका टप्प्यातून जात आहे. जिथे माझी क्रिकेट कारकीर्द थांबेल आणि माझ्या आवडीचा नवा अध्याय सुरू होईल. पण खेळण्यासाठी देखील एक विशिष्ट वय असते. दुर्दैवाने मी आयपीएलच्या या मोसमात खूप कमी सामने खेळलोय. तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागतो. शिखर धवन आयपीएलच्या या मोसमात केवळ 5 सामने खेळू शकला. शिखर धवनच्या जागी त्यामुळे सॅम कुरन याने पंजाब किंग्जचे नेतृत्व केलेय.
शिखर धवन याला भारतीय क्रिकेट संघात देखील स्थान मिळू शकलेले नाही. सध्या तो फॉर्मात नाही. शिखर धवन टीम इंडियाकडून 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. त्याच्या जागी भारतीय संघात रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामीवीराची भूमिका बजावत आहे. आयपीएलदरम्यान दुखापतीमुळे शिखर धवन जास्त सामने खेळू शकला नाही.
धवनने 2010 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. जेथे त्याने पहिला वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. धवनने जून 2011 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती.
आयपीएलमध्ये ५ सामन्यांमध्ये त्याने 125.62 च्या स्ट्राईक रेटने 152 धावा केल्या आहेत. दुखापतीमुळे तो उर्वरित सामन्यांचा भाग होऊ शकला नाही. तो निवृत्ती घेणार की हे अजून तरी त्याने गुलदस्त्यात ठेवले आहे.