IPL 2022 Final मधील पराभवानंतर आपल्याच माणसांचा अश्विनवर हल्लाबोल, सल्ल्याच्या नावाखाली सुनावलं
IPL 2022 Final: अश्विन अनेकदा पारंपारिक ऑफ ब्रेक ऐवजी कॅरम बॉल जास्त टाकतो. फायनलमध्ये गुजरात टायटन्सकडून राजस्थानचा सात विकेटने पराभव झाला.

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीग (IPL) स्पर्धेच्या 15 व्या सीजनची काल सांगता झाली. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला. गुजरातने राजस्थान रॉयल्सला सात विकेटने नमवून यंदाच्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. गुजरातचा संघ या संपूर्ण स्पर्धेत चॅम्पियन्स सारखा खेळला. राजस्थानचं दुसऱ्या विजेतेपदाच स्वप्न साकार होऊ शकलं नाही. 2008 उद्घाटनाच्या पहिल्याच हंगामात त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली होती. पुन्हा त्यांना त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. राजस्थानच्या पराभवानंतर त्या टीमचे क्रिकेट संचालक कुमार संगकाराला यांनी रविचंद्रन अश्विनला (R.AShwin) काही सल्ले दिले आहेत. रविचंद्रन अश्विन एक महान क्रिकेटपटू आहे. पण त्याने ऑफ ब्रेक गोलंदाजी जास्त केली पाहिजे. कसोटीत भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 442 कसोटी विकेट घेतल्यात. अश्विन आपल्या गोलंदाजीत सतत वेगवेगळे प्रयोग करत असतो.
कॅरम बॉलचा जास्त वापर
अश्विन अनेकदा पारंपारिक ऑफ ब्रेक ऐवजी कॅरम बॉल जास्त टाकतो. फायनलमध्ये गुजरात टायटन्सकडून राजस्थानचा सात विकेटने पराभव झाला. त्यानंतर बोलताना संगकारा म्हणाले की, “अश्विनने आमच्यासाठी उत्तम कामगिरी केलीय. क्रिकेटच्या मैदानावर अश्विनने जे कमावलय, त्यामुळे तो लीजेंड ठरतो. तरी सुद्धा सुधारणेला वाव आहे. त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी जास्त केली पाहिजे” अश्विनने यंदाच्या सीजनमध्ये 17 सामन्यात 12 विकेट घेतल्या.
फायनलमध्ये अश्विनने किती धावा दिल्या
आर.अश्विनने फायनलमध्ये ऑफ ब्रेक चेंडूंऐवजी कॅरम बॉल जास्त टाकला. त्याने अंतिम सामन्यात 3 ओव्हरमध्ये 32 धावा दिल्या. पण एकही विकेट काढली नाही. राजस्थानच्या टीमला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये फक्त 130 धावाच करता आल्या. विजयासाठी हे लक्ष्य पुरेस नव्हतं.
अश्विनला ऑफ स्पिनवर विश्वास नाही का?
“130 धावांचं लक्ष्य पुरेसं नव्हतं. आम्ही गोलंदाजी घेण्याचाही विचार केला होता. आम्ही मैदानात आलो, त्यावेळी खेळपट्टी कोरडी होती. ही खेळपट्टी मंद होत जाईल, ज्यावर आमच्या फिरकी गोलंदाजांना टर्न मिळेल, असं आम्हाला वाटलं. आम्ही 160 ते 165 धावांची अपेक्षा केली होती” असे संगकारा म्हणाला.