IND vs WI: कॅप्टन म्हणून पहिली सीरीज जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला…
रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) वनडे सीरीजमध्ये निर्भेळ यश संपादन केलं.
अहमदाबाद: रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) वनडे सीरीजमध्ये निर्भेळ यश संपादन केलं. नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिला मालिका विजय आहे. “या मालिकेतून आम्हाला जे हवं होतं, ते आम्ही मिळवलं. आम्ही खेळतोय तो पर्यंत आवाज होत राहणार. भारतीय संघावर (Indian Team) टीका करणाऱ्यांबद्दल रोहित हे वाक्य म्हणाला. भारतातील एक महत्त्वाचा खेळ आम्ही खेळतोय. लोक आमच्याकडे बघतायत, याची मला कल्पना आहे. एक खेळाडू, व्यक्ती म्हणून कुठे लक्ष केंद्रीत करायचं, ते आम्हाला ठाऊक आहे. बाहेर कितीही आवाज झाला, तरी आम्ही ड्रेसिंग रुममध्ये त्याची चिंता करत नाही. आमच्याकडून जे अपेक्षित आहे, ते आम्ही सर्व करु” असं रोहित म्हणाला.
प्रसिद्ध कृष्णाचं कौतुक “खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळतेय, तेव्हा प्रसिद्धच्या रुपाने तशी बॉलिंग करणारा गोलंदाज आमच्याकडे आहे. आमच्या वेगवाने गोलंदाजांनी चांगली प्रभावी गोलंदाजी केली. सिराजने सुद्धा चांगली बॉलिंग केली. शार्दुल, दीपकला वेगवेगळया प्रसंगात संधी मिळाली. कुलदीप आणि चहल दोघेही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत” असे रोहितने सांगितलं.
भारताने वेस्ट इंडिजचा 96 धावांनी पराभव करुन मालिकेत 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही गोलंदाजांमुळे विजय शक्य झाला. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा अचूक लाभ उठवला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून वेस्ट इंडिजला दबावाखाली ठेवलं. वेस्ट इंडिजकडून एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही.