IND vs SL ODI Series: ‘जे उपाशी मरतायत त्यांनी…’ भारत-श्रीलंका सीरीजआधी मंत्र्याच वादग्रस्त विधान
IND vs SL ODI Series: हा मंत्री स्वत: कोट्यधीश आहे. त्याला वादग्रस्त वक्तव्य करण्याची गरज नव्हती.
तिरुअनंतपूरम: भारतात क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांची स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहण्याची इच्छा असते. महागड्या तिकीट दरांमुळे अनेकदा चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहता येत नाही. केरळच्या क्रीडा मंत्र्यांनी अशाच चाहत्यांची खिल्ली उडवली आहे. ‘ज्यांची उपासमार सुरु आहे, त्यांनी मॅच पाहण्याची गरज नाही’ असं केरळचे क्रीडामंत्री अब्दुर्रहीमन म्हणाले. प्रेक्षकांवर मनोरंजन टॅक्स आकारण्याचा कथित निर्णय सरकार मागे घेणार? असा प्रश्न पत्रकारांनी रविवारी क्रीडा मंत्री अब्दुर्रहीमन यांना विचारला. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.
सीरीजची तिसरी मॅच कुठे होणार?
भारत आणि श्रीलंकेमधील वनडे सीरीजचा तिसरा सामना केरळच्या तिरुअनंतपूरम येथे होणार आहे. या सामन्यासाठी स्टेडियममधील तिकीटांचे दर खूप आहेत. मनोरंजन टॅक्स हे त्यामागच एक कारण आहे. त्याच मुद्यावर अब्दुर्रहीमन यांना प्रश्न विचारण्यात आला.
विरोधी पक्षांकडून वक्तव्याचा समाचार
त्यावर टॅक्स कमी करण्याची काय गरज? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. “देशात प्रत्येक वस्तुचे भाव वाढतायत. त्यामुळे तिकीटाचे दर स्वस्त करावेत, या तर्काला अर्थ नाही. ज्यांची उपासमार सुरु आहे, अशा लोकांनी मॅच पाहण्याची गरज नाही” असं अब्दुर्रहीमन म्हणाले. केरळमध्ये विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि भाजपाने त्यांच्या या विधानचाा चांगलचा समाचार घेतला.
अशा मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाका
“राज्यात लोकशाही मार्गाने कम्युनिस्ट सरकार सत्तेवर आहे. एका मंत्र्यांच्या तोंडून असं वक्तव्य ऐकून लोक हैराण आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्याला तासाभरासाठी सुद्धा मंत्रिमंडळात ठेऊ नये. गरीबांचा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा यावर काय म्हणणं आहे?” असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते वी.डी.सतीसन यांनी केला. वी अब्दुर्रहीमन कोट्यधीश मंत्री
वी अब्दुर्रहीमन केरळच्या श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. एका रिपोर्ट्नुसार त्यांच्याजवळ 17.17 कोटी संपत्ती आहे. मंत्री स्वत: श्रीमंत असल्यामुळे त्यांना कदाचित महागड्या तिकीट दराने फरक पडत नसावा.