वानखेडेवर एका इनिंगमध्ये 10 विकेट, पण तरीही टीममधून काढलं, ‘हा’ आहे क्रिकेटविश्वातील कमनशिबी बॉलर
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने जी कामगिरी केली, त्याला तोड नव्हती, या कसोटीचा निकाल काय लागला?
मुंबई: मागच्यावर्षी टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरीज झाली. त्यावेळी वानखेडेवर एजाज पटेल नावाच्या गोलंदाजाने धुमाकूळ घातला होता. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने 4 डिसेंबर 2021 रोजी वानखेडेवर जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्याआधी क्रिकेटच्या इतिहासात फक्त 2 गोलंदाजांना अशी कामगिरी करणं शक्य झालय.
तेच या कसोटीच वैशिष्ट्य
एजाजमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव 325 धावात आटोपला होता. या कसोटीच वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये सर्वच्या सर्व 10 विकेट एजाजने काढल्या होत्या. त्याने 47.5 ओव्हर्समध्ये 119 धावा देऊन 10 विकेट काढल्या होत्या.
अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज
एजाजच्या आधी जीम लेकर आणि अनिल कुंबळे यांनीच एका इनिंगमध्ये सर्वच्या सर्व 10 विकेट काढण्याचा कारनामा केला आहे. एजाज कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा क्रिकेट विश्वातील तिसरा गोलंदाज आहे. पण त्याला क्रिकेटमधील सर्वात कमनशिबी गोलंदाज म्हटलं जातं.
न्यूझीलंडची टीम किती रन्सनी हरली?
एजाजने एका इनिंगमध्ये सर्वच्या सर्व 10 विकेट घेतल्या. पण तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. न्यूझीलंडच्या टीमने खराब प्रदर्शनामुळे हा सामना 372 धावांनी गमावला. या सामन्यानंतर एजाजला टीम बाहेर करण्यात आलं. एजाजने यावर्षी जून महिन्यात इंग्लंड विरुद्ध कसोटी संघात पुनरागमन केलं होतं.
कधीपासून टीम बाहेर आहे?
एजाजने 10 विकेट घेतल्या. त्यानंतर न्यूझीलंडच्या टीमने बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळली. पण दोन्ही सीरीजसाठी एजाजला टीममध्ये स्थान मिळालं नाही. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या सीरीजसाठी एजाजला टीममध्ये स्थान मिळालं. पण दोन कसोटी सामन्यांसाठी त्याला बाहेर करण्यात आलं. आता मागच्या 5 महिन्यांपासून तो कसोटी टीमबाहेर आहे.