खराब बॅटिंगने लाजिरवाणा रेकॉर्ड, अजिंक्य रहाणेच्या निरोपाची वेळ, शतकवीर श्रेयस अय्यरला संधी
भारतीय कसोटी संघाचा फुल टाईम उपकर्णधार आणि सध्याचा (कानपूर कसोटी) कर्णधार अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म कायम आहे. कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही त्याची बॅट शांतच राहिली.
1 / 5
भारतीय कसोटी संघाचा फुल टाईम उपकर्णधार आणि सध्याचा (कानपूर कसोटी) कर्णधार अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म कायम आहे. कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही त्याची बॅट शांतच राहिली. कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात एका चौकाराच्या मदतीने 15 चेंडूत चार धावा केल्यानंतर तो डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. तर पहिल्या डावात तो 35 धावा करुन काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला होता. अशा प्रकारे त्याने पुन्हा एकदा निराशा केली आहे. डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत शतक झळकावल्यानंतर अजिंक्य रहाणेला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे त्याच्या टीम इंडियातील जागेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई कसोटीत त्याला संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
2 / 5
अजिंक्य रहाणेने 2021 मध्ये 12 कसोटी सामने खेळले असून 19.57 च्या सरासरीने 411 धावा केल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत त्याला केवळ दोनच अर्धशतकं झळकावता आली आहेत. 67 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. पहिल्या पाचमध्ये क्रमांकांवर खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये ही एका कॅलेंडर वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वाईट धावांची सरासरी आहे. एका कॅलेंडर वर्षात अॅलन लँबच्या नावावर त्याच्यापेक्षा वाईट सरासरीचा विक्रम आहे. 1986 मध्ये त्याने 12 कसोटीत 19.33 च्या सरासरीने 406 धावा केल्या होत्या.
3 / 5
टॉप-फाइव्हमध्ये फलंदाजी करणाऱ्या सध्या सक्रिय फलंदाजांपैकी अजिंक्य रहाणेला सलग 22 डावांमध्ये शतक झळकावता आलेले नाही. त्याचवेळी त्याचा साथीदार चेतेश्वर पुजाराला सलग 40 डावांत शतक झळकावता आलेले नाही. 2021 हे वर्ष अजिंक्य रहाणेसाठी सर्वात वाईट वर्ष ठरले आहे. यापूर्वी कधीही कसोटी क्रिकेटमध्ये त्याची धावांची सरासरी ३० च्या खाली गेली नव्हती, परंतु यावर्षी ती 20 पेक्षा कमी आहे. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याची सरासरी 2013 मध्ये 43.40, 2014 मध्ये 44.94, 2015 मध्ये 45.61, 2016 मध्ये 54.41, 2017 मध्ये 34.62, 2018 मध्ये 30.66, 2019 मध्ये 71.33, 2020 मध्ये 38.85 आणि 2021 - 19.57 इतकी राहिली आहे.
4 / 5
2021 मध्ये अजिंक्य रहाणे आठ डावात दुहेरी आकडा पार करू शकला नाही. यादरम्यान, तो दोनदा शून्यावर बाद झाला आणि दोनदा केवळ एक धाव काढू शकला. त्याने फटकावलेली दोन अर्धशतके ही दोन्ही इंग्लंडविरुद्धची आहेत. घरच्या मैदानावर खेळताना त्याने 67 धावांची इनिंग खेळली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर 61 धावा फटकावल्या होत्या. याशिवाय त्याला केवळ दोनदाच 30 प्लस स्कोअर करता आला आहे. यापैकी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये 49 धावा आणि कानपूर टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 35 धावा करता आल्या. हे दोन्ही डाव न्यूझीलंडविरुद्ध खेळले गेले.
5 / 5
2021 मध्ये खराब कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेचे कसोटीतील आकडे खूपच खालावले आहेत. भारतासाठी 75 कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजांमध्ये त्याची सरासरी सर्वात वाईट आहे. रहाणेने 79 कसोटीत 39.30 च्या सरासरीने 4795 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 12 शतके आणि 24 अर्धशतके आहेत. रहाणे वगळता, 75 पेक्षा जास्त कसोटी खेळलेल्या भारताच्या एकाही फलंदाजाची सरासरी 40 पेक्षा कमी नाही. अशा स्थितीत रहाणे टीम इंडियातून जवळपास बाहेर फेकला गेला असल्याचे मानले जात आहे.