Ajinkya rahne : अजिंक्य राहणेचं टेस्ट करिअर धोक्यात? दुसऱ्या कसोटीतून राहणेला वगळलं
अजिंक्य राहणेला बाहेर बसवण्याचं कारण दुखापत जरी सांगितलं असलं तरी सर्वांनाच माहीत आहे, गेल्या काही दिवसांपासून राहणेचा खेळ काही खास राहिला नाही. राहणेच्या खात्यात गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या रन्स नाहीत.
मुंबई : अजिंक्य राहणेचं कसोटी करिअर धोक्यात आलं आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य राहणेला संघातून वगळून बाहेर बसवण्यात आलं आहे. कानपूर येथील गेल्या कसोटी सामन्यात राहणे कर्णधारपद संभाळताना दिसून आला, मात्र त्याला मुंबईतील कसोटीत स्थान मिळवता आलं नाही. पहिल्या कसोटी सामन्यावेळी कर्णधार विराट कोहली आराम करत होता, त्यामुळे टीमची धुरा राहणेकडे दिली होती. शिवाय राहणेला विराट कोहलीच्या अनुपस्थित कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा चांगला अनुभवही आहे.
राहणेचं कसोटी करिअर संपलं?
अजिंक्य राहणेला बाहेर बसवण्याचं कारण दुखापत जरी सांगितलं असलं तरी सर्वांनाच माहीत आहे, गेल्या काही दिवसांपासून राहणेचा खेळ काही खास राहिला नाही. राहणेच्या खात्यात गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या रन्स नाहीत. दुसरीकडे टीममध्ये दाखल झालेला युवा खेळाडू श्रेयस अय्यरने पहिल्याच कसोटी सामन्यात शतक ठोकत सर्वांच्या नजरा वळवल्या. पहिल्या कसोटी सामन्यावेळी आराम करणार विराट कोहली दुसऱ्या कसटो सामन्यात परत आला, त्यामुळे कुणाला ना कुणाला बाहेर बसावच लागणार होतं. त्यावर कोण बाहेर बसणार अशा चर्चाही रंगल्याचं पहायला मिळालं आणि जाणकारांनी ज्या शक्यता वर्तवल्या होत्या तेच झालं, शेवटी अजिंक्य राहणेला दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं.
राहणेचं भारताबाहेर प्रदर्शन चांगलं
विदेशी पिचवर जिथे इतर भारतीय फलंदाजांची पंचाईत होते, अशा ठिकाणी राहणेचा खेळ चांगला झाला आहे. ज्यावेळी टीम संकटात असते, त्यावेळी राहणेने अनेकदा जोमाने खिंड लढवत टीमला अडचणीतून बाहेर काढले आहे. ऑस्ट्रेलिया सिरीजमधून विराट कोहली परत आल्यानंतर राहणेच्या नेतृत्वातच टीम इंडियाने तब्बल 32 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात मात दिली होती. त्यानंतर अजिंक्य राहणेवर कौतुकाचा वर्षाव झाल्याचंही पहायला मिळालं. मात्र मागील काही दिवसांपासून राहणेच्या खराब खेळामुळे राहणेला कायमचं बाहेर जावं लागणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
राहणेला टी-20, वनडेतही जागा नाही
दुसरीकडे टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात ओपनिंगला रोहित शर्मा आणि केएल राहुलची जोडी मैदान गाजवतेय. तर मधल्या फळीची धुराही सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, विराट कोहली यांनी संभाळली आहे. त्यामुळे राहणेला तिकडेही जागा मिळणार नाही. व्ही. व्ही. एस लक्ष्मण रिटायर झाल्यापासून राहणेने कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीत चांगली कामगिरी केली आहे, मात्र आता त्याच्या खराब फॉर्ममुळे ती जागा युवा खेळाडू श्रेयस अय्यर घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.