Andrew Symonds च्या पोस्ट मॉर्टमला उशीर, बहिणीच्या वक्तव्यामुळे मृत्यूभोवतीचं रहस्य आणखी गडद
Andrew Symonds death: हा दुर्देवी अपघात ज्या ठिकाणी घडला, तिथे सायमन्ड्सची बहिण गेली होती. तिने एक संदेश तिथे लिहून ठेवलाय. "खूप लवकर लांब निघून गेलास. आपल्याला अजून एक दिवस मिळाला असता, अजून एक फोन कॉल झाला असता"
मुंबई: तीन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू अँड्र्यू सायमन्ड्सचा (Andrew Symonds death) रस्ते अपघातात (Road accident death) मत्यू झाला. अँड्र्यू सायमन्ड्सचं असं अकाली निधन, हा क्रिकेट विश्वासाठी एक मोठा धक्का आहे. शनिवारी रात्री टाऊन्सविले (townsville) येथे सायमन्ड्सच्या कारचा मोठा अपघात झाला. सायमन्ड्सची कार रस्ता सोडून पलटी झाली. अपघाताचा आवाज ऐकून आसपास राहणारे लोक मदतीसाठी धावले. पण त्यांना अँड्र्यू सायमन्ड्सचे प्राण वाचवता आले नाहीत. अँड्र्यूच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी एक विधान केलय, त्यामुळे सायमन्ड्सच्या मृत्यूचं रहस्य आणखी गडद झालाय. रात्रीच्यावेळी सायमन्ड्स एकटा गाडी का चालवत होता? ते आम्हाला ठाऊक नाही, असं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलय.
रात्री त्या रस्त्यावर कशासाठी गेला होता?
हा दुर्देवी अपघात ज्या ठिकाणी घडला, तिथे सायमन्ड्सची बहिण गेली होती. तिने एक संदेश तिथे लिहून ठेवलाय. “खूप लवकर लांब निघून गेलास. आपल्याला अजून एक दिवस मिळाला असता, अजून एक फोन कॉल झाला असता. मी मनातून खचून गेलेय. बंधु, माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम राहिलं” असं तिने या संदेशात लिहिलं आहे. “सायमन्ड्स शनिवारी रात्री त्या रस्त्यावर कशासाठी गेला होता? ते मला ठाऊक नाही” असं तिने डेली मेल ऑस्ट्रेलियाशी बोलताना म्हटलं.
मृतदेहाचं शवविच्छेदन का केलं नाही?
क्वीन्सलँड पोलीस या अपघाताची चौकशी करत असून ते रिपोर्ट् बनवतील. टाऊन्सविलेचे अधिकारी ख्रिस लॉसन यांनी, अँड्र्यू सायमन्ड्सच्या मृतदेहाचं शवविच्छेदन का केलं नाही? त्यामागच कारण सांगितलं. टाऊन्सविलेमध्ये बाहेरुन दुसरा डॉक्टर आल्यानंतरच हे शवविच्छेदन शक्य आहे.
सायमन्ड्सने जनावराचे प्राण वाचवले?
शवविच्छेदनाच्यावेळी काही प्रक्रिया कराव्या लागणार आहेत. ते करणारा डॉक्टर त्या भागात उपलब्ध नाहीय. बाहेरुन या डॉक्टरला क्वीन्सलँडमध्ये आणावे लागेल, असं एका वृत्तात म्हटलं आहे. सायमन्ड्सच्या कारने रस्ता का सोडला? त्या प्रश्नाचे या घडीला पोलिसांकडेही उत्तर नाहीय. जनावराचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात सायमन्ड्सच्या गाडीचा अपघात झाला अशी चर्चा या भागातील स्थानिकांमध्ये आहे.
एक कुत्रा तर खूप संवेदनशील होता
अपघाताच्यावेळी जी महिला घटनास्थळी होती, तिने सांगितलं की, सायमंड्स सोबत त्यांची दोन कुत्री सुद्धा कारमध्ये होती. या दोन्ही श्वानांचे प्राण वाचले. “एक कुत्रा तर खूप संवेदनशील होता. तो सायमंड्सला सोडून जायला तयार नव्हता” असं तिने सांगितलं. ऑस्ट्रेलियन कुरीयर मेलने तिच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.