Arjun Tendulkar : मुंबईने संधी नाकारल्यानंतर अर्जुन तेंडूलकर खेळणार दुसऱ्या टीमकडून, MCA ने दिली मान्यता
एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की करिअरच्या या टप्प्यावर अर्जुनसाठी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे महत्त्वाचे आहे. आम्हाला विश्वास आहे की दुसऱ्या टीममधून खेळल्याने अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई : दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आता मुंबई संघ सोडला आहे. पुढील सीझनमध्येच तो गोव्यासाठी (GCA) खेळताना दिसून येणार आहे, अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज अजून इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग होता, त्याने 2020-21 मध्ये हरियाणा आणि पुद्दुचेरी विरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी दोन सामने खेळले. मात्र मुंबईकडून त्याला पुरेशी संधी मिळत नव्हती. एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की करिअरच्या या टप्प्यावर अर्जुनसाठी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे महत्त्वाचे आहे. आम्हाला विश्वास आहे की दुसऱ्या टीममधून खेळल्याने अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला आहे.
MCA ने ना हरकत प्रमाणपत्र दिले
गोवा राज्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (MCA) आज ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. MCA ने त्याला गोवा राज्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. गेल्या हंगामात अर्जुन तेंडुलकर हा मुंबई रणजी संघाचा काही काळ सदस्य होता. मात्र, एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र येत्या ऑक्टोबर महिन्यापासून देशांतर्गत स्थानिक क्रिकेटचा (फर्स्ट क्लास क्रिकेट) नवा हंगाम सुरू होत आहे, त्याच संधीच्या शोधात आता अर्जुन तेंडुलकरची पुढील घौडदौड असणार आहे.
सिद्ध करण्याचीही संधी मिळाली नाही
अर्जुन तेंडुलकरने तीन हंगामापूर्वी भारताच्या अंडर-19 संघाकडून श्रीलंकेविरुद्ध दोन सामने खेळले होते. त्यावेळी मुंबईच्या संभाव्य मर्यादित षटकांच्या संघातही त्याचा समावेश होता. अर्जुनसाठी सर्वात मोठी निराशा म्हणजे या मोसमात त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी न मिळाल्याने मुंबई संघातून वगळण्यात आले. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की अर्जुन तेंडुलकरचा राज्यातील संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश केला जाऊ शकतो, त्यामुळे त्याला आता नवे वेध लागले आहेत.
गोव्याकडून तर संधी मिळणार का?
जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी सांगितले की आम्ही आमच्या संघासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज शोधत आहोत. म्हणूनच आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोवा संघात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. हंगामापूर्वी आम्ही मर्यादित षटकांचे सराव सामने खेळू आणि तो या सामन्यांमध्ये खेळेल. या सामन्यातील त्याच्या कामगिरीच्या आधारे निवड समिती त्याला संघात ठेवण्याचा निर्णय घेतील, असे गोव्याकडूनही स्पष्ट करण्यात आलंय.