Arshdeep singh: ‘जर तुला वाटतं की, तू….’ वसीम अक्रम अर्शदीप सिंहला असं का म्हणाला?
वसीम अक्रमने अर्शदीप सिंहला असं काय सांगितलं होतं?
मुंबई: आशिया कप 2022 टुर्नामेंटमध्ये टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली नाही. पण युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने आपलं बॉलिंग कौशल्य या टुर्नामेंटमध्ये दाखवलं. अर्शदीप सिंहने अखेरच्या ओव्हर्समध्ये कमालीची गोलंदाजी केली. त्याने आपल्या कौशल्याने अनेकांची मनं जिंकली. टुर्नामेंट दरम्यान अर्शदीपची त्याचे आदर्श वसीम अक्रमशी भेट झाली.
तो किस्साही इंटरेस्टिंग आहे
अर्शदीपच्या मनात काही प्रश्न होते. त्याची उत्तर त्याला वसीम अक्रम यांच्याकडून मिळाली. या भेटीआधी वसीम अक्रमने अर्शदीपला जे सांगितलं होतं, तो किस्साही इंटरेस्टिंग आहे.
वसीम अक्रम अर्शदीप सिंहला काय म्हणाले?
अर्शदीपचे कोच जसवंत राय यांनी वरिष्ठ पत्रकार विमल कुमार यांच्याबरोबर चर्चेमध्ये या भेटीचा खुलासा केला. वसीम अक्रमने अर्शदीपच्या गोलंदाजीच कौतुक केलं होतं. अक्रम त्यावेळी अर्शदीपला म्हणाला होता की, ‘तुला वाटतं की तू परफेक्ट आहेस, तर माझ्याकडे येऊ नकोस’. ‘तुला शिकायचं असेल, तर कधीही माझ्याकडे ये’ असं अक्रम म्हणाला होता.
संपूर्ण रात्र विचार केला
अर्शदीप सिंहने त्यानंतर आपले कोच जसवंत राय यांच्याबरोबर चर्चा केली. तो संपूर्ण रात्र वसीम अक्रमच्या त्या शब्दांचा विचार करत होता. दुसऱ्यादिवशी अर्शदीप वसीम अक्रमजवळ गेला व त्यांच्याशी गोलंदाजीबद्दल चर्चा केली.
अर्शदीपने क्षमता दाखवली
अर्शदीप सिंहने आशिया कपच्या 5 सामन्यात 5 विकेट घेतल्या. त्याचा इकॉनमी रेट प्रति ओव्हर 8 रन्सपेक्षा जास्त होता. हा आकडा खराब आहे. पण अर्शदीपने सर्वाधिक गोलंदाजी डेथ ओव्हर्समध्ये केली होती.
त्याच्याविरोधात कारस्थान रचलं
सुपर 4 मध्ये पाकिस्तान विरुद्ध महत्त्वाचा सामना झाला. त्यावेळी अर्शदीपच्या हातून आसिफ अलीचा झेल सुटला. सामन्यातील तो महत्त्वाचा क्षण होता. सोशल मीडियावर त्याबद्दल त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. पाकिस्तानी यंत्रणांनी त्याच्याविरोधात कारस्थान रचलं. त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. अर्शदीपने त्या दबावाचा चांगल्या पद्धतीने सामना केला. अर्शदीपची टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात निवड झालीय.