CSK IPL 2023 : ‘आता तुला अजिंक्य का हवा? त्यावेळी तर तू….’, सेहवागचा एमएस धोनीला थेट सवाल
CSK IPL 2023 : धोनी त्यावेळी रहाणेबद्दल जे बोलला होता, त्याचीच सेहवागने त्याला आठवण करुन दिली. धोनी आता अजिंक्य रहाणेच कौतुक करतोय, पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो.
CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सकडून अजिंक्य रहाणे शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दमदार इनिंग खेळला. त्याने चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. या मॅचमध्ये अजिंक्य रहाणेने चेन्नईकडून डेब्यु केला. अजिंक्य रहाणे त्याच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये खेळत होता. अजिंक्य रहाणे आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जात नाही. पण दोन दिवसांपूर्वी त्याने सर्वांनाच थक्क करुन सोडलं. त्याने 27 चेंडूत 61 धावा फटकावल्या.
चेन्नईने या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सवर सहा विकेट राखून विजय मिळवला. सीएसकेचा आयपीएल 2023 मधील हा दुसरा विजय आहे.
अजिंक्यला CSK ने किती किंमतीला विकत घेतलं?
डिसेंबर महिन्यात आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शन झालं. या ऑक्शनमध्ये सीएसकेने अजिंक्य रहाणेला 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. मॅच संपल्यानंतर कॅप्टन एमएस धोनीने अजिंक्य रहाणेबरोबर सीजन सुरु होण्याआधी काय चर्चा झाली, त्या बद्दल सांगितलं.
धोनीने अजिंक्यला काय सांगितलेलं?
“मी आणि अजिंक्यने सीजन सुरु होण्याआधी चर्चा केली. मी त्याला सांगितलं, तुझं जे बलस्थान आहे, क्षमता आहे, त्यानुसार खेळ. मैदानावर जाऊन मॅचचा आनंद घे. तणाव घेऊ नकोस, हे मी त्याला सांगितलं. आम्ही तुला पहिल्या सामन्यात कदाचित संधी देणार नाही. पण जेव्हा संधी मिळेल, तेव्हा पाठिंबा देऊ” असं सांगितल्याच धोनी म्हणाला.
अजिंक्य रहाणे टीममध्ये का हवा?
या मॅचनंतर आता विरेंद्र सेहवागने सीएसके टीममध्ये अजिंक्य रहाणेच्या स्थानावरुन एमएस धोनीला थेट प्रश्न विचारलाय. रहाणे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरमधील बराचसा काळ धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलाय. 2018 पर्यंत अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा भाग होता. त्यानंतर त्याने संघातील स्थान गमावलं. आता सीएसकेच्या कॅप्टनला अजिंक्य रहाणे टीममध्ये का हवा? असा प्रश्न सेहवागने विचारलाय.
मग धोनीने अजिंक्यला टीम इंडियात का स्थान दिलं नाही? ‘अजिंक्य रहाणेमध्ये त्याने काय पाहिलं? त्याला टीममध्ये स्थान दिलय’, असं सेहवाग क्रिकबजवर बोलताना म्हणाला. “खेळाडूला आत्मविश्वाची गरज असते. मला धोनीला विचारायचय, तो जेव्हा भारतीय टीमचा कॅप्टन होता, तेव्हा त्याने अजिंक्यला टीममध्ये स्थान दिलं नाही. तो स्लो खेळतो, स्ट्राइक बदलत नाही असं म्हटलं. मग आता जेव्हा त्याला अनुभवाची गरज भासली, तेव्हा तो अजिंक्य रहाणेला घेऊन आला” असं सेहवाग म्हणाला. रहाणे टीम इंडियाकडून शेवटचा टी 20 सामना कधी खेळला?
धोनीच्याच नेतृत्वाखाली अजिंक्य रहाणेने 2016 साली टी 20 टीममधील स्थान गमावलं. वेस्ट इंडिज विरुद्ध तो टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये खेळला होता. रहाणे टीम इंडियाकडून खेळलेला ती शेवटची टी 20 मॅच आहे.