R Ashwin: रोहित नेतृत्व करणार, अश्विन वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेला मुकणार
पुढच्या दोन दिवसात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघनिवड होऊ शकते. अश्विनचा वनडे आणि टी-20 संघात पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (Ind vs WI) आगामी वनडे आणि टी-20 मालिकेसाठी रविचंद्रन अश्विन (R Ashwin) उपलब्ध नाहीय. अश्विनने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पुन्हा एकदा स्वत:च स्थान निर्माण केलय. पण अश्विनवर उपचार सुरु आहे, त्यामुळे तो 6 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांसाठी मंगळवारी संघ निवड होणार होती. पण कोच राहुल द्रविड आणि अन्य निवड समिती सदस्य उपलब्ध नसल्याने ही निवड पुढे ढकलण्यात आली.
पुढच्या दोन दिवसात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघनिवड होऊ शकते. अश्विनचा वनडे आणि टी-20 संघात पुन्हा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी होणाऱ्या टी-20 आणि आगमी 2023 वर्ल्डकप रणनीतीचा तो भाग आहे. अश्विनच्या अनुभवाचा संघाला फायदा मिळावा हा या रणनितीमागचा उद्देश आहे. क्रिकबझने हे वृत्त दिलं आहे.
टीम मॅनेजमेंट अश्विनच्या बाबतीत वर्कलोड मॅनेजमेंटचा पर्याय अवलंबणार आहे. जेणेकरुन मोठ्या स्पर्धांना तो मुकणार नाही. उपचारांमुळे तो तीन आठवडे मैदापासून दूर राहणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तो पुनरागमन करु शकतो. नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी आणि वनडेमध्ये तो निष्प्रभ ठरला होता. रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी तो नियमित कर्णधार म्हणून जबाबदारी संभाळेल. कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच मालिका आहे.