IND vs PAK: पाकिस्तानची टीम गॅसवर, दुसरा प्रमुख गोलंदाजही बाहेर होणार?
आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत-पाकिस्तान (IND vs PAK) लढतीला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. या सामन्याआधी पाकिस्तानच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत-पाकिस्तान (IND vs PAK) लढतीला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. या सामन्याआधी पाकिस्तानच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पाकिस्तानचा प्रमुख डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे आधीच बाहेर गेला आहे. आता दुसऱ्या प्रमुख गोलंदाजाच्या दुखापतींची चिंता पाकिस्तानला सतावत आहे. मोहम्मद वसिमला (Mohammad Wasim) पाठिदुखीचा त्रास जाणवला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ टेन्शन मध्ये आला आहे. गुरुवारी सराव सत्राच्यावेळी मोहम्मद वसिमची पाठदुखी बळावली. लगेच त्याला MRI स्कॅनसाठी दुबईच्या रुग्णालयात नेण्यात आलं. त्याचा एमआरआयचा रिपोर्ट अजून आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तान चिंतेत आहे.
पाकिस्तानी गोटात चिंता
पाकिस्तानचा पारंपारिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध रविवारी सामना होणार आहे. वसिमच्या दुखापतीमुळे पाकिस्तानी गोटात चिंता आहे. कारण आधीच त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीद शाह आफ्रिदी गुडघे दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळत नाहीय. आशिया कप स्पर्धेत श्रीलंका, अफगाणिस्तानचे संघही आहेत. आशियातील या मातब्बर संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 27 ऑगस्टला सुरु होणाऱ्या आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबरला होणार आहे.
आशिया कप नंतर पाकिस्तानच्या एकापाठोपाठ एक मालिका
मोहम्मद वसिम गुरुवारी 21 वर्षांचा झाला. आयसीसी अकादमीत सराव सुरु असताना गुरुवारी त्याला पाठदुखीचा त्रास झाला. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचा पाठिदुखीमुळे आशिया कप स्पर्धेत समावेश करण्यात आलेला नाही. आशिया कप नंतर पाकिस्तानचा संघ मायदेशात इंग्लंड विरुद्ध सात टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याधी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड मध्येही तिरंगी मालिका खेळणार आहे. आशिया कप मध्ये 12 दिवसात पाकिस्तानचा संघ पाच सामने खेळू शकतो.
मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोहम्मद वसिम प्रभावी
जुलै महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध मोहम्मद वसिमने डेब्यु केला. तो आतापर्यंत 11 टी 20 सामन्यात खेळला आहे. 15.88 च्या सरासरीने त्याने 17 विकेट घेतल्या आहेत. मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत मोहम्मद वसिमने प्रभावी कामगिरी केली होती. तिथे त्याने तीन एकदिवसीय सामन्यात पाच विकेट घेतले होते.