IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध हरलो पण ‘या’ तीन गोष्टी चांगल्या घडल्या
IND vs PAK: भारताचा पाच विकेट राखून पराभव केला. टीम इंडियाने हा सामना गमावला हे खंर आहे. पण या मॅच मध्ये एक चांगली गोष्ट सुद्धा घडली.
मुंबई: टीम इंडियाचा काल पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला. आशिया कप स्पर्धेत सुपर 4 राऊंड मध्ये पाकिस्तानने भारताचा पाच विकेट राखून पराभव केला. टीम इंडियाने हा सामना गमावला हे खंर आहे. पण या मॅच मध्ये एक चांगली गोष्ट सुद्धा घडली. या सामन्याआधी कॅप्टन रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या फॉर्मची चिंता सतावत होती. हे तिघे संघाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. पण आशिया कप स्पर्धेत त्यांची बॅट तळपली नव्हती. त्यामुळे टीम इंडियासाठी हे तिघे अडचणीचे ठरतायत, असा क्रिकेट चाहत्यांमधून सूर उमटत होता.
काल आशिया कप मध्ये दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान मध्ये लढत झाली. यावेळी रोहित, राहुल आणि विराट यांनी जबाबदारीने खेळ केला. त्यामुळे भारताची धावसंख्या 181 पर्यंत पोहोचली. यात विराटच योगदान सर्वात जास्त आहे. पण रोहित-राहुल जोडीने सुरुवातही तशीच खणखणीत करुन दिली. अगदी पहिल्या षटकापासून रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्ला चढवला.
रोहित बोलला ते अग्रेसिव इंटेंट दिसलं
रोहित शर्माने टीम इंडियाची कमान संभाळली, त्यावेळी इंटेंट नावाचा शब्दप्रयोग केला होता. अग्रेसिव इंटेंट म्हणजे आक्रमक क्रिकेट खेळणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. कालच्या सामन्यात रोहित शर्माने अगदी तसाच खेळ दाखवला. ते आक्रमक इंटेट त्याच्या फलंदाजीत दिसलं. रोहितने काल 16 चेंडूत 28 धावा फटकावल्या. यात तीन चौकार आणि दोन षटकार होते. याआधी रोहितने पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात 12 आणि हाँगकाँग विरुद्ध 21 धावा केल्या होत्या. आक्रमकता रोहितच्या फलंदाजीतून गायब होती. कालच्या सामन्यात तो आक्रमक अंदाज दिसला.
ते 20 चेंडू त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढवतील
केएल राहुलसाठी सुद्धा कालचा सामना महत्त्वाचा होता. झिम्बाब्वे दौऱ्यापासून त्याचा संघर्ष सुरु होता. आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यात तो प्रभाव पाडू शकला नव्हता. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात तो शुन्यावर आऊट झाला. हाँगकाँग विरुद्ध दुसऱ्या लढतीत त्याने 36 धावा केल्या. त्यासाठी 39 चेंडू घेतले. ही टी 20 क्रिकेटला अजिबात साजेशी फलंदाजी नव्हती. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून त्याला बाहेर बसवण्याची मागणी सुरु होती. पण काल राहुलने केलेल्या धावा त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढवतील. राहुलने 20 चेंडूत 28 धावा फटकावल्या. यात एक चौकार आणि दोन षटकार होते.
Virat Kohli and Pakistan The Untold Love Story ??@imVkohli #INDvsPAK2022 pic.twitter.com/q39zY9WBOA
— Dhruv⚡ (@IncredibleKohli) September 4, 2022
सामना गमावला त्याची खंत आहे, पण…
विराट कोहलीने काल सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. आशिया कप सुरु झाल्यापासून विराट कोहलीच्या खेळात बरीच सुधारणा झाली आहे. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात 35 त्यानंतर हाँगकाँग विरुद्ध नाबाद 59 धावांची खेळी केली होती. त्याची फलंदाजी पाहून मनात तो विश्वास निर्माण होत नव्हता. पण काल पाकिस्तान विरुद्ध तो जुना विराट कोहली दिसला. त्याने खणखणीत बॅटिंग केली. 44 चेंडूत 60 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि एक षटकार होता. भारताने काल सामना गमावला त्याची खंत आहे. पण या त्रिकुटाच टी 20 वर्ल्ड कप आधी फॉर्म मध्ये येणं, ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे.