IND vs PAK: 1 चेंडू राखून पाकिस्तानचा रोमांचक विजय, 5 पॉइंट मधून समजून घ्या भारताच्या पराभवाची कारणं….
IND vs PAK: परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने 5 विकेट राखून हा सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना सात विकेट गमावून 181 धावा केल्या.
मुंबई: आशिया कप स्पर्धेत सुपर 4 राऊंड सुरु झाला आहे. काल दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान मध्ये सामना झाला. परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने 5 विकेट राखून हा सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना सात विकेट गमावून 181 धावा केल्या. पाकिस्तानच्या टीमने हे लक्ष्य एक चेंडू बाकी राखून पार केलं.
भारत-पाकिस्तान सामना नेहमी अटी-तटीचा होता. तो रोमांच, उत्साह या सामन्यात सुद्धा पहायला मिळाला. दोन्ही टीम्सनी जिंकण्यासाठी आपली ताकत पणाला लावली. सामन्यात अनेक चढ-उतार पहायला मिळाले. शेवटच्या षटकात सामन्याचा निकाल लागला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात अखेर पाकिस्तानने विजय मिळवला.
पाकिस्तानला याच मैदानात आठवड्याभरापूर्वी 28 ऑगस्टला भारताने पराभूत केलं होतं. त्याची परतफेड पाकिस्तानच्या टीमने केली. कालच्या सामन्यातील भारताच्या पराभवाची पाच कारणं समजून घेऊया.
- 18 व्या ओव्हर मध्ये अर्शदीप सिंहने आसिफ अलीचा सोपा झेल सोडला. पाकिस्तानसाठी हे जीवनदा फायद्याचं ठरलं. कारण त्यानंतर आसिफने मोठे फटके खेळून भारताकडून विजय हिरावून घेतला.
- मोहम्मद रिजवान आणि मोहम्मद नवाजने महत्त्वपूर्ण भागीदारी केली. टीम संकटात होती. त्यांनी आपले दोन महत्त्वाचे फलंदाज गमावले होते. त्यावेळी दोघांनी 73 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पाकिस्तानच्या विजयाचा पाया रिजवान-नवाज जोडीने रचला.
- रोहित शर्मा आणि केएल राहुल जोडीने जबरदस्त सुरुवात करुन दिली होती. टीमची धावसंख्या 200 पर्यंत पोहोचेल असं वाटलं होतं. पण टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. त्यामुळे टीम इंडियाला अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं नाही.
- भुवनेश्वर कुमारने टाकलेलं 19 व षटक महागडं ठरलं. त्या ओव्हर मध्ये 19 धावा निघाल्या. त्याच ओव्हर मध्ये विजय भारताच्या हातून निसटला.
- पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी या मॅच मध्ये शानदार गोलंदाजी केली. नवाज आणि शादाब खानने जास्त धावा दिल्या नाहीत. त्याचवेळी विकेट घेण्यातही यशस्वी ठरले. नवाजने 4 ओव्हर मध्ये 25 धावा देऊन एक विकेट घेतला. शादाबने चार ओव्हर मध्ये 31 धावा देऊन दोन विकेट काढल्या.