IND vs PAK सामन्यासाठी पाकिस्तानी चाहत्याने 2 म्हशी विकल्या, पराभवानंतर काय केलं ते जाणून घ्या….VIDEO
IND vs PAK: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारताने पाकिस्तानला (IND vs PAK) 5 विकेटने हरवलं. या विजयासह भारताने आपल्या अभियानाची शानदार सुरुवात केली आहे.
मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारताने पाकिस्तानला (IND vs PAK) 5 विकेटने हरवलं. या विजयासह भारताने आपल्या अभियानाची शानदार सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2 चेंडू बाकी राखून 148 धावांचे लक्ष्य पार केलं. या हायवोल्टेज सामन्यात भारत जिंकल्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष झाला. विजयाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. त्याचवेळी पाकिस्तानी चाहत्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. असाच एका पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पाकिस्तानच्या पराभवानंतर हा चाहता कोलमडला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने षटकार ठोकल्यानंतर या चाहत्याला आपले अश्रू रोखता आले नाहीत.
पण म्हशी का विकल्या?
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, हा पाकिस्तानी चाहता आपल्या दोन म्हशी विकून भारत-पाक सामना पाहण्यासाठी आला होता. त्याने 2 लाख रुपयात दोन म्हशी विकल्या. त्यातून जे पैसे मिळाले, ते खर्च करुन तो सामना पहायला आला होता. बाबर आजमच्या टीमने मात्र पाकिस्तानी चाहत्याला विजयाच्या सेलिब्रेशनची संधी दिली नाही. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव 147 धावात आटोपला. प्रत्युत्तरात भारताने 5 विकेट गमावून 19.4 षटकात विजयी लक्ष्य गाठलं. हार्दिक पंड्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने 25 धावा पाकिस्तानच्या तीन विकेट काढल्या. त्यानंतर फलंदाजी करताना 17 चेंडूत नाबाद 33 धावा फटकावल्या. भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
भारत विरुद्ध पाकिस्तान हायवोल्टेज सामना
पाकिस्तानच्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुल आऊट झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भागीदारी केली. त्यांनी संघाची धावसंख्या 1 बाद 50 पर्यंत पोहोचवली. त्यानंतर आधी रोहित आऊट झाला. तीन धावांच्या अंतराने विराट बाद झाला. दोघे पाठोपाठ बाद झाल्यामुळे पाकिस्तानला वरचढ होण्याची संधी मिळाली. सूर्यकुमार यादवही डाव सावरु शकला नाही. 89 धावांवर भारताचा चौथा विकेट पडला. त्यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सावरला. दोघांनी भारताचा विजय सुनिश्चित केला. गोलंदाजी विभागात भुवनेश्वर कुमारने 26 धावात 4 विकेट काढल्या. अर्शदीप सिहंने 2 आणि आवेश खानने एक विकेट काढला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवानने सर्वाधिक 43 धावा केल्या.