Asia cup 2022: रोहित, विराट, अनुष्का दुबईसाठी रवाना, पाकिस्तानचा संघ दाखल
Asia cup 2022: दुसऱ्याबाजूला पाकिस्तानी संघ दुबईत दाखल झाला आहे. सर्वांनाच उत्सुक्ता असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायप्रोफाईल सामना 28 ऑगस्टला होणार आहे.
मुंबई: आशिया कप (Asia cup) टी 20 स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ आज सकाळी दुबईला रवाना झाला. रोहित शर्मा, (Rohit sharma) विराट कोहली (Virat kohli) त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि अन्य सदस्यांचे दुबईला रवाना होत असतानाचे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले. दुसऱ्याबाजूला पाकिस्तानी संघ दुबईत दाखल झाला आहे. सर्वांनाच उत्सुक्ता असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायप्रोफाईल सामना 28 ऑगस्टला होणार आहे.
पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघ 3 दिवस दुबई मध्ये ट्रेनिंग करणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेआधी आशिया कपच्या माध्यमातून भारताला पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची संधी मिळत आहे. मागच्यावर्षी दुबईत झालेल्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये दोन्ही संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी पाकिस्तानने भारतावर 10 विकेट राखून एकतर्फी विजय मिळवला होता. भारतीय संघ या पराभवाचा हिशोब चुकता करण्यासाठी उत्सुक्त आहे. पाकिस्तानी संघ नेदरलँडवरुन दुबई मध्ये दाखल झाला आहे.
80 ते 90 टक्के टीम तयार
भारतीय संघ दुबईला रवाना होत असतानाच, टीम इंडियासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या दुबईला जाण्याबद्दल साशंकता आहे. या परिस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाच्या हेड कोचची जबाबदारी संभाळू शकतात. आशिया कप मध्ये खेळणारा संघच ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप मध्ये दिसू शकतो. वर्ल्ड कपच्या दृष्टीने भारताचा 80 ते 90 टक्के संघ तयार आहे, असं विधान कॅप्टन रोहित शर्माने केलं होतं. जास्तीत जास्त आणखी 3 ते 4 बदल संघात संभवतात, असं रोहितने म्हटलं होतं.