Asia Cup 2022: पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार?
Asia Cup 2022: क्रिकेट चाहत्यांना आता भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची उत्सुक्ता लागली आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आधी दोन्ही संघ आशिया कप मध्ये आमने-सामने येणार आहेत.
मुंबई: क्रिकेट चाहत्यांना आता भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची उत्सुक्ता लागली आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आधी दोन्ही संघ आशिया कप मध्ये आमने-सामने येणार आहेत. 27 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धा सुरु होतेय. 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान सामना होईल. मागच्यावर्षी यूएईत झालेल्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये साखळी फेरीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याची भारताला संधी आहे. या लढतीआधीच दोन्ही संघात कुठले, कुठले खेळाडू असतील, त्याची चर्चा आतापासूनच सुरु झाली. आशिया कप मधील या रंगतदार सामन्याला पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी मुकण्याची शक्यता आहे. तो पूर्णपणे फिट नाहीय. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने हे मान्य केलय. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलय.
म्हणून आफ्रिदीला वेळ देण्यात येणार
बाबर आजमने दिलेल्या माहितीनुसार, शाहीद शाह आफ्रिदी अजून पूर्णपणे गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरलेला नाही. नेदरलँड विरुद्धच्या दोन वनडे सामन्यांसाठी शाहीन शाह आफ्रिदीला विश्रांती दिली जाईल, असं बाबर आजमने सांगितलं. आशिया कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्याआधी फिट होण्यासाठी म्हणून आफ्रिदीला वेळ देण्यात येणार आहे.
आम्ही दूरगामी विचार करतोय
“शाहीनला अजून विश्रांतीची गरज आहे. दुखापतीमधून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्याला अजून थोडा वेळ लागेल. त्याचं आरोग्य आणि तंदुरुस्ती बद्दल आम्ही दूरगामी विचार करतोय. नेदरलँड विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी आम्ही त्याला विश्रांती देणार आहोत, जेणेकरुन आशिया कपसाठी फिट होईल” असं पाकिस्तानी कर्णधाराने सांगितलं.
Live – Pakistan skipper Babar Azam interacts with the media in Lahore ahead of the team’s departure to the Netherlands for the ODI series ?#NEDvPAK | #BackTheBoysInGreen https://t.co/fCZUDa0Xab
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 11, 2022
पाकिस्तानी संघात चार वेगवान गोलंदाज
पाकिस्तान निवड समितीने हसन अलीला वगळलं आहे. तो त्याच्या कामगिरीने प्रभावित करु शकला नाही. पाकिस्तानी संघात चार वेगवान गोलंदाज आहेत. हॅरीस रौफ, शहानवाज दाहानी, नसीम शाह आणि मोहम्मद वसीम.
नेदरलँडस विरुद्ध सीरीजसाठीही संघाची घोषणा
आशिया कपसाठी टीम निवडण्याशिवाय पाकिस्तानने नेदरलँडस विरुद्ध वनडे सीरीजसाठी सुद्धा 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. नेदरलँडस आणि पाकिस्तान मध्ये 16 ते 21 ऑगस्ट दरम्यान वनडे सीरीज होईल. आशिया कप 2022 चं आयोजन 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान UAE मध्ये होईल.