Asia Cup 2023 : Super 4 मध्ये कधी, कुठे आणि कोणाला भिडणार टीम इंडिया, कशी होणार भारत-पाक फायनल?
Asia Cup 2023 : आशिया कपमधील सुपर 4 राऊंडबद्दल जाणून घ्या. मागच्या शनिवारी भारत-पाकिस्तानच्या लढतीवर पावसाने पाणी फिरवलं होतं. पण सुपर-4 मध्ये क्रिकेट रसिकांना हा थरार अनुभवता येईल. कुठे आणि किती तारखेला ही मॅच होणार त्याबद्दल जाणून घ्या.
कोलंबो : आशिया कप 2023 स्पर्धेतील लीग स्टेज संपली आहे. पुढच्या म्हणजे सुपर-4 राऊंडसाठी चार टीम निश्चित झाल्या आहेत. ग्रुप-ए मधून भारत आणि पाकिस्तानने क्वालिफाय केलय. ग्रुप-बी मधून श्रीलंका आणि बांग्लादेश सुपर-4 मध्ये दाखल झाले आहेत. लीग स्टेजमध्ये पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना होऊ शकला नाही. पण सुपर-4 राऊंडमध्ये दोन्ही देशांमध्ये सामना होईल. फायनलमध्ये सुद्धा या दोन टीम्स आमने-सामने येऊ शकतात. आतापर्यंत भारत-पाकिस्तानची टीम आशिया कपच्या फायनलमध्ये आमने-सामने आलेली नाही. पण यावेळी असं झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
भारत आणि पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे सुपर-4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळला हरवावच लागणार होतं. भारताने अगदी आरामात नेपाळवर विजय मिळवला. भारताच्या आधी पाकिस्तानने नेपाळला पराभूत केलं होतं. आता यापुढच्या राऊंडमध्ये सर्वच सामने अटीतटीचे होतील. सुपर-4 मध्ये भारतच शेड्युल कसं आहे? भारत-पाकिस्तान पहिल्यांदा फायनलमध्ये कसे खेळू शकतात. त्याबद्दल जाणून घ्या. सुपर-4 मध्ये दाखल झालेल्या सर्व टीम परस्पराविरुद्ध खेळणार आहेत. प्रत्येक टीम तीन-तीन सामने खेळणार आहे. भारताला सुपर-4 मध्ये पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 10 सप्टेंबरला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडियासमोर तीन चांगल्या टीमच आव्हान
12 सप्टेंबरला टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना सुद्धा प्रेमदासा स्टेडियमवरच होईल. 15 सप्टेंबरला भारतीय टीम बांग्लादेश विरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध ज्या ठिकाणी मॅच होणार आहे, तिथेच हा सामना होईल. तीन मॅचमध्ये टीम इंडियासमोर तीन चांगल्या टीमच आव्हान असेल.
भारत-पाकिस्तान कमी लेखण्याची चूक करणार नाहीत
सुपर-4 मध्ये एकूण सहा सामने खेळले जातील. या सहा सामन्यानंतर ज्या दोन टीम टॉप-2 मध्ये असतील. त्यांच्यात फायनल मॅच होईल. पाकिस्तान आणि भारत सुपर-4 स्टेजमध्ये टॉप-2 मध्ये असेल, तर भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये फायनल निश्चित आहे. याची शक्यता जास्त आहे. ज्या चार टीम सुपर-4 मध्ये पोहोचल्या आहेत, त्यात भारत आणि पाकिस्तान मजबूत संघ आहेत. श्रीलंका आणि बांग्लादेश चांगल्या टीम आहेत. पण भारत आणि पाकिस्तान इतके हे मजबूत संघ नाहीत. हे क्रिकेट आहे आणि इथे काहीही होऊ शकतं. भारत आणि पाकिस्तानला याची कल्पना आहे, त्यामुळे ते अन्य दोन टीम्सना कमी लेखणार नाहीत.