Asia Cup 2023 : अचानक झाली नव्या संघाची एन्ट्री, पहिल्यांदाच खेळणार आशिया कप
Asia Cup 2023 : यंदा आशिया कप पाकिस्तानमध्ये होणार आहे. पण बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तानला पाठवण्यासाठी तयार नाही. पण या दरम्यान नव्या संघाची या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे.
Asia Cup 2023 : आयपीएलनंतर क्रिकेट चाहत्यांना आशिया कप 2023 सामन्यांची मज्जा घेता येणार आहे. सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. पण बीसीसीआय सचिव जय शाह ( Jay shah ) यांनी स्पष्ट केले होते की टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला ( Pakistan ) जाणार नाही. अशा स्थितीत ही स्पर्धा कुठे खेळवली जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या स्पर्धेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण यावेळी एक नवीन संघ स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या संघाचा भारत आणि पाकिस्तानच्या गटात समावेश करण्यात आला आहे.
1984 पासून आशिया कपचे आयोजन
आशिया कप 1984 पासून आयोजित केला जात आहे. पण यंदा नेपाळचा क्रिकेट संघ इतिहास रचून 2023 च्या आशिया कपसाठी पात्र ठरला आहे. नेपाळ क्रिकेट संघ पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळणार आहे. आशिया चषक 2023 साठी पाच संघ आधीच पात्र ठरले आहेत. नेपाळ हा या स्पर्धेतील सहावा संघ असेल. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यासोबत आता नेपाळ संघ देखील खेळताना दिसणार आहे.
UAE संघाचा पराभव
नेपाळ संघाने मंगळवारी काठमांडू येथील टीयू क्रिकेट मैदानावर एसीसी पुरुष प्रीमियर चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) पराभव करून आशिया चषक (आशिया कप 2023) मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. गेल्या वेळी यूएई सहावा संघ म्हणून या मेगा स्पर्धेत सहभागी झाला होता, परंतु यावेळी तो आशिया कपचा भाग असणार नाही. UAE संघाने प्रथम फलंदाजी करताना 33.1 ओव्हरमध्ये केवळ 117 धावा केल्या होत्या. नेपाळ क्रिकेट संघाने 30.2 ओव्हरमध्ये 118 धावा करत यूएईचा पराभव केला.
भारत-पाकिस्तान संघ भिडणार
आशिया कप 2023 मध्ये लीग स्टेज, सुपर-4 आणि फायनलसह एकूण 13 सामने खेळले जातील, जरी या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. आशिया चषक हा एकदिवसीय प्रकारात खेळला जाईल, ज्यामध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघ एकाच गटात असतील, तर गतविजेते श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ दुसऱ्या गटात असतील.
भारत-पाकिस्तान वाद
आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे स्पर्धेचं ठिकाण अजून ही वादात आहे. त्यामुळे आयसीसीच्या निर्णय़ाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आशियाई क्रिकेट परिषदेला आपला प्रस्ताव देताना सांगितले की, आम्ही हायब्रीड मॉडेलने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान त्यांच्या देशात सामने खेळेल. भारत त्यांना हव्या त्या ठिकाणी सामने खेळू शकते. भारत-पाकिस्तान सामना तिसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. मात्र याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.