IND vs SL: भारत-श्रीलंकेच्या प्लेयर्सना सापापासून धोका! वाचवण्याची तयारी सुरु
IND vs SL: भारत-श्रीलंकेच्या खेळाडूंना अचानक सापापासून कसा धोका निर्माण झाला? नेमका विषय काय आहे?
IND vs SL: टीम इंडियाची सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. या सीरीजमधला तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी खेळला जाणार आहे. या मॅचनंतर तीन वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे. गुवाहाटीपासून या सीरीजची सुरुवात होईल. काही दिवसांपूर्वी या मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामना झाला. या मॅचमध्ये काहीवेळासाठी अडथळा आला होता. त्याचं कारण होतं, मैदानात आलेला साप. त्याशिवाय या मैदानात एका मॅचमध्ये लाइटची समस्या निर्माण झाली होती. आसाम क्रिकेट संघटनेने या समस्येवर मात करण्याची तयारी केलीय.
पहिला वनडे सामना कधी?
भारत आणि श्रीलंकेमध्ये तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. पहिला वनडे सामना 10 जानेवारीला होईल. याआधी या मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 2 ऑक्टोबर 2022 रोजी टी 20 सामना झाला होता. या सामन्यात भारताचा विजय झाला होता.
एसीएने उचलली ही पावलं
यावेळी मॅचमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी एसीएसने जोरदार तयारी केली आहे. सापांना मैदानावर येण्यापासून रोखण्यासाठी एका NGO ची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय. अचानक लाइट गेल्यामुळेही समस्या निर्माण झाली होती. “भारत-दक्षिण आफ्रिका सामन्या दरम्यान फ्लड लाइट टॉवरमध्ये अडचण आली होती. फ्लड लाइट्समध्ये LED बल्ब लावण्याच काम खूप आधीच सुरु झालय. पण हे लाइट्स लावण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्तचा वेळ लागू शकतो. 10 जानेवारीला होणाऱ्या सामन्यात सध्या असलेल्या फ्लड लाइटसचा उपयोग केला जाईल” असं तरंग गोगोई यांनी सांगितलं.
वायरिंगची तपासणी
“टॉवरशिवाय स्टेडियममधील वायरिंग आणि अन्य टेक्निकल गोष्टी सुद्धा तपासण्यात आल्या आहेत. भारत-दक्षिण आफ्रिक सामन्यावेळी जे घडलं, ते पुन्हा होऊ नये, यासाठी आम्ही काळजी घेतोय” असं तरंग गोगोई म्हणाले. काय काळजी घेतलीय?
सापांना मैदानावर येण्यापासून रोखण्यासाठी एका एनजीओची मदत घेतलीय. केमिकल मैदानात शिंपडण्यात आलं आहे. मैदानच नाही, स्टँडमध्येही साप येऊ नये, यासाठी काळजी घेण्यात आलीय.