AUS vs ENG 3rd Ashes Test, Day 2: इंग्लंडचा डाव अडचणीत, हातात आलेली संधी दवडली
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 267 धावात संपुष्टात आला. त्यांच्याकडे फक्त 82 धावांची आघाडी होती. इंग्लंडला कसोटीत पुनरागमन करण्याची संधी होती. पण...
मेलबर्न: अॅशेस मालिकेतील (Ashes series) तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस रंगतदार ठरला. इंग्लंडला वरचढ होण्याची संधी होती. पण दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाने भेदक मारा करुन इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. काल ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा (Aus vs Eng) पहिला डाव 185 धावात गुंडाळला. त्यानंतर दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या एक बाद 61 धावा झाल्या होत्या. आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर इंग्लिश गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 267 धावात संपुष्टात आला. त्यांच्याकडे फक्त 82 धावांची आघाडी होती. इंग्लंडला कसोटीत पुनरागमन करण्याची संधी होती. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले. दुसऱ्यादिवस अखेर इंग्लंडच्या चार बाद 31 धावा झाल्या आहेत. इंग्लंड अजूनही 51 धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार जो रुट अजूनही खेळपट्टीवर उभा आहे, हाच काय तो इंग्लंडसाठी आशेचा किरण आहे. हासीब हमीद (7), झॅक क्रॉली (5) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले.
डेविड मालान भोपळाही न फोडता तंबूत परतला. जॅक लीचही शून्यावर बाद झाला. वेगवान गोलंदाज स्टार्क आणि बोलँडने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कदाचित उद्याच या कसोटी सामन्याचा निकाल लागू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सलामीवीर मार्कस हॅरिसने सर्वाधिक (76) धावा केल्या. त्याचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी फारशी चमकदार कामगिरी केली नाही.
इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक चार, रॉबिनसन, वूडने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-0 ने आघाडीवर असून उद्या निकाल लागल्यास ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी आहे.