AUS vs PAK, Womens World Cup 2022: बिस्माह मारुफचं अर्धशतक वाया, पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव
आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेत (ICC Women’s World Cup 2022) पाकिस्तान महिला संघाच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने (Australia Women) पाकिस्तानचा पराभव केला.
ऑकलंड: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेत (ICC Women’s World Cup 2022) पाकिस्तान महिला संघाच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने (Australia Women) पाकिस्तानचा पराभव केला. सलग दोन पराभवांमुळे पाकिस्तानचा स्पर्धेतील पुढचा मार्ग खडतर बनला आहे. वर्ल्डकपमधील दुसरा सामना खेळणाऱ्या पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 191 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावून आरामात हे लक्ष्य पार केलं. ऑस्ट्रेलियाकडून एलिसा हिलीने (Alyssa Healy) शानदार खेळ दाखवला. पाकिस्तानचा पराभव करण्याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 12 धावांनी पराभव केला होता. या स्पर्धेत पाकिस्तानने पहिला सामना भारताविरोधात खेळला होता. त्या लढतीत भारताने पाकिस्तानवर 107 धावांनी मोठा विजय मिळवला. 92 चेंडू बाकी असताना ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरुद्धचा हा सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानकडून मिळालेल्या 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. इंग्लंडविरोधात दमदार फलंदाजी करणारी रेचल हँस पाकिस्तान विरोधात फक्त 34 धावा करुन आऊट झाली. त्याचवेळी एलिसा दुसऱ्याटोकाकडून दमदार फलंदाजी करत होती. तिने पहिल्या विकेटसाठी रेचल हँससोबत मिळून 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार मेग लॅनिंगसोबत मिळून अर्धशतकी भागादारी रचली. लॅनिंग 35 धावांवर आऊट झाली.
एलिसा हिलीने 79 चेंडूत 72 धावा केल्या. त्यामुळे तिला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने एकाडावात सात चौकार लगावले. त्यानंतर पेरी आणि मुनीने मिळून टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पेरीने 26 आणि मुनीने 23 धावा केल्या.
पाकिस्तानच्या संघाने 50 षटकात सहा विकेट गमावून 190 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बिस्माह मारुफने सर्वाधिक नाबाद 78 धावा केल्या. आलिया रियाजने 53 धावांची खेळी केली. दोघांमध्ये 99 धावांची भागीदारी झाली. ज्यामुळे संघाची धावसंख्या 190 पर्यंत पोहोचली.