Ind vs Aus: 208 धावा बनवूनही टीम इंडिया का हरली? काय आहेत पराभवाची कारणं?
टीम इंडियाच नेमकं काय चुकलं, जाणून घ्या 5 पॉइंटसमधून
मुंबई: आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाने खराब प्रदर्शन केलं. निदान मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये विजयी सुरुवात करेल, ही अपेक्षा होती. पण असं झालं नाही. मंगळवारी मोहालीत तीन टी 20 सामन्यांच्या सीरीजमधला पहिला सामना खेळला गेला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 4 विकेटने हरवलं. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 19.2 ओव्हरमध्ये हे लक्ष्य पार केलं.
टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं?
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर मोठं लक्ष्य ठेवलं होतं. टीम इंडिया सहज विजय मिळवेल, असं वाटत होतं. पण टी 20 वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाने शानदार खेळ दाखवला. कॅमरुन ग्रीनने 30 चेंडूत 61 धावा ठोकल्या. मॅथ्यू वेडने 21 चेंडूत नाबाद 45 धानवा केल्या. टीम इंडिया कशामुळे पराभूत झाली, ते पाच पॉइंटमधून समजून घेऊया.
- या मॅचमध्ये टॉस खूप महत्त्वाचा होता. कारण मैदानात दव पडतो. त्यामुळे दुसऱ्याडावात कुठल्याही टीमला गोलंदाजी करायला आवडत नाही. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा टॉस हरला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. त्यांनी टीम इंडियाला प्रथम फलंदाजीची संधी दिली.
- टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 209 धावांच मोठं लक्ष्य ठेवलं होतं. त्यांना चांगल्या सुरुवातीची गरज होती. फिंच आणि कॅमरन ग्रीनने पहिल्या ओव्हरपासून भारतीय गोलंदाजांना दबावाखाली ठेवलं. त्यांनी आक्रमक सुरुवात केली.
- ग्रीनची तुफानी फलंदाजी टीम इंडियाच्या पराभवाच मुख्य कारण ठरली. तो जबरदस्त इनिंग खेळून गेला. त्याने भारतीय गोलंदाजांना सेटच होऊ दिलं नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना दिशा आणि टप्पा शेवटपर्यंत सापडलाच नाही.
- टीम इंडियाच्या फिल्डर्सनी या मॅचमध्ये खूपच खराब प्रदर्शन केलं. अक्षर पटेलने सुरुवातीलाच ग्रीनची कॅच सोडली. केएल राहुलने सुद्धा स्टीव स्मिथचा झेल सोडला. हर्षल पटेलने 18 व्या ओव्हरमध्ये मॅथ्यू वेडची कॅच सोडली. या कॅच पकडल्या असत्या, तर निकाल वेगळा लागला असता.
- डेथ ओव्हर्समध्ये टीम इंडियाचे गोलंदाज अचूक टप्पा आणि दिशा राखू शकले नाहीत. त्यांनी स्वैर मारा केला. शेवटच्या ओव्हर्समध्ये धावा रोखण्याची गरज होती. पण भारतीय गोलंदाजांनी मोठ्या प्रमाणात धावा दिल्या. त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला.