T20 World Cup आधी ऑस्ट्रेलियाला मायदेशात मोठा झटका
T20 World Cup आधी ऑस्ट्रेलियाला अजून बरीच मेहनत करावी लागेल
मुंबई: टी 20 वर्ल्ड कपआधी (T20 World cup) ऑस्ट्रेलियाला मायदेशात मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंड (Aus vs Eng) विरुद्ध 3 टी 20 सामन्याची सीरीज गमावली आहे. कॅनबरामध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलियात दुसरा टी 20 सामना झाला. या मॅचमध्ये इंग्लंडने (England) 8 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडने पहिला टी 20 सामनाही 8 धावांच्या फरकाने जिंकला होता. दुसऱ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य दिले होते.
इंग्लंडची खराब सुरुवात
ऑस्ट्रेलियाच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 170 धावा केल्या. 49 चेंडूत 82 धावा फटकावणारा डेविड मलान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर इंग्लंडने 54 धावात 4 विकेट गमावल्या होत्या.
जोस बटलर, एलेक्स हेल्स, बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रुक्स स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यानंतर डेविड मलान आणि मोइन अलीने डाव सावरला. दोघांनी मिळून धावसंख्या 146 पर्यंत पोहोचवली.
मलान आणि मोइनने संभाळला डाव
मोइन अलीच्या रुपात इंग्लंडची पाचवी विकेट गेली. त्यानंतर मलानला कोणाकडून भक्कम साथ मिळाली नाही. टीमची धावसंख्या 171 असताना मलान आऊट झाला. मलानने आपल्या इनिंगमध्ये 7 चौकार आणि 4 षटकार लगावले. मार्कस स्टॉयनिसने 34 धावात सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. एडम झम्पाने 2 विकेट घेतल्या.
51 धावात तीन टॉप फलंदाज बाद
इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने एरॉन फिंच, डेविड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेलच्या रुपात 51 धावात तीन विकेट गमावल्या. मिचेल मार्शने 45 धावा फटकावून डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही.
सॅम करनची भेदक गोलंदाजी
91 धावांवर स्टॉयनिसच्या रुपात ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट गेली. त्यानंतर मार्शला टिम डेविडची साथ मिळाली. पण 114 धावांवर पाचवी विकेट गेली. ऑस्ट्रेलियाचा डाव 145 पर्यंत पोहोचवल्यानंतर डेविड आऊट झाला. मॅथ्यू वेड 10 आणि पॅट कमिन्स 18 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडच्या सॅम करनने 25 धावात 3 विकेट घेतल्या.