बाईक चालवताना नियंत्रण गमावलं, शेन वॉर्न अपघातात जखमी, 15 मीटरपर्यंत फरपटत गेला
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न बाईक अपघातात जखमी झाला आहे. वॉर्न त्याच्या मुलासोबत (जॅक्सन) बाईकवरून जात असताना तो पडला आणि 15 मीटरपर्यंत फरफटत गेला.
कॅनबरा : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न बाईक अपघातात जखमी झाला आहे. वॉर्न त्याच्या मुलासोबत (जॅक्सन) बाईकवरून जात असताना तो पडला आणि 15 मीटरपर्यंत फरफटत गेला. अपघातानंतर शेन वॉर्नने सांगितले की, त्याला खूप खरचटले आहे आणि जखमा झाल्या आहेत, या जखमा खूप दुखत आहेत. 52 वर्षीय शेन वॉर्नला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, परंतु जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याला खूप वेदना जाणवत होत्या. त्यानंतर तो रुग्णालयात गेला. तिथे त्याने फ्रॅक्चर झालं आहे का, याची तपासणी केली. मात्र, स्कॅनमध्ये असे काहीही समोर आले नाही. त्याला कोणतेही फ्रॅक्चर झालेलं नाही. (Australia spinner Shane Warne injured in accident while riding with son Jackson)
शेन वॉर्न लवकरच अॅशेस मालिकेदरम्यान समालोचन करताना दिसणार असल्याचे मानले जात आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका 8 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार आहे. शेन वॉर्न हा जगातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने 145 कसोटीत 708 विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने 800 बळी घेतले. त्याचबरोबर वॉर्नने 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 विकेट घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या नावावर 1319 विकेट्स आहेत. शेन वॉर्नने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
अनेकदा वादात अडकला
शेन वॉर्न त्याच्या खेळाव्यतिरिक्त त्याचं लाईफस्टाइल आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. ड्रग्ज घेणे, सेक्स स्कँडल अशा अनेक वादांमध्ये त्याचे नाव आले आहे. त्याच्या रंगेल स्वभावामुळे तो नेहमीच लाईमलाईटमध्ये असतो. 2003 च्या विश्वचषकापूर्वी तो ड्रग्ज टेस्टमध्ये फेल झाला होता. यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. त्याचप्रमाणे 1999 च्या विश्वचषकापूर्वी त्याने श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.
1998 मध्ये त्याने सट्टेबाजांना खेळपट्टी आणि हवामानाची माहिती देऊन पैसे घेतल्याप्रकरणी त्याच्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने कारवाई केली होती. त्याला मोठा दंड ठोठावला होता. त्यानंतर 2013 मध्ये बिग बॅश लीगदरम्यान त्याने मार्लोन सॅम्युअल्सला शिवीगाळ आणि टिंगल केली. यामुळे त्याला बंदी आणि दंडालाही सामोरे जावे लागले.
इतर बातम्या
IND vs NZ : टीम इंडिया धर्मसंकटात, विराट कोहलीसाठी कोणता फलंदाज बलिदान देणार?
‘माझी भारतीय संघात निवड करु नका’; हार्दिक पंड्याची निवड समितीला विनंती
ख्रिस गेल घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणार? ‘युनिव्हर्स बॉस’कडून निवृत्तीचे संकेत
(Australia spinner Shane Warne injured in accident while riding with son Jackson)