Glenn Maxwell | 1 ग्यारा के बराबर हैं, काल अख्ख्या जगाने पाहिलं
Glenn Maxwell | क्रिकेटच्या पलीकडे रोजच्या आयुष्यातही बरच काही शिकवणारी इनिंग. ग्लेन मॅक्सवेलची अफगाणिस्तान विरुद्धची इनिंग क्रिकेटमधील एक बेस्ट खेळी होती. त्यावेळी स्टेडियमवर जे उपस्थित होते, त्यांच्या डोळ्यांच पारण फिटलं. वर्ल्ड कप 2023 मधला हा एक बेस्ट सामना होता.
मुंबई : 1 ग्यारा के बराबर हैं, हे शब्द काहीवेळा आपल्या कानावर पडतात. रणांगणात, खेळाच्या मैदानात किंवा हाणामारीच्या प्रसंगात 1 ग्यारा के बराबर हैं, हे शब्द आपण किंवा दुसरा कोणीतरी बोलून जातो. समोरच्या प्रतिस्पर्ध्याची ताकद किती मोठी आहे, तो किती बलवान आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न या वाक्यामध्ये दडलेला असतो. कालची ग्लेन मॅक्सवेलची इनिंग पाहिल्यानंतर सर्व प्रथम हेच शब्द आठवले. अफगाणिस्तानसमोर शहेनशाहसारखी भासणारी ऑस्ट्रेलियन टीम पार कोलमडून गेली होती. एका मध्यम, सामान्य शरीर यष्टीच्या माणसाने तगड्या पैलवानावर प्रहार करुन त्याला खाली पाडावं, अशी ऑस्ट्रेलियन संघाची हालत झालेली. ऑस्ट्रेलिया हरणार, ऑस्ट्रेलियाने मॅच गमावली, असच बहुतेक लोकांनी गृहित धरलेलं. कारण 18.3 ओव्हर्समध्ये 91 रन्सवर 7 विकेट तिथून विजयासाठी आणखी 200 धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर ज्या पद्धतीने ढेपाळली, ते पाहता विजय अशक्य वाटत होता.
पण त्याचवेळी मैदानात ग्लेन मॅक्सवेल नावाच वादळ घोघावलं. DDLJ चित्रपटात शेवटच्या सीनमध्ये शाहरुख खान लाठ्या-काठ्या खाऊन घायाळ होऊन पडलेला असतो. त्याचवेळी वडिल अनुपम खेरवर एक यांच्यावर एक लाठी उगारली जाते आणि शाहरुख चवताळून उठतो. मग, समोर दिसेल, त्याची धुलाई. कालची ग्लेन मॅक्सवेलची इनिंग तशीच होती. मॅक्सवेलची फलंदाजी म्हणजे वन मॅन शो होता. ऑस्ट्रेलियन टीम होतीच कुठे?. ना गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा धाक दिसला, ना फलंदाजीत. डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन हे जंगलातले नव्हे, फक्त कागदावरचे वाघ दिसले. ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात 1 ग्यारा के बराबर हैं, असा खेळ दाखवला. म्हणा,त्याने शब्द सिद्ध करुन दाखवले.
तो मैदानात लोळला, वेदनेने विव्हळला, पण…
ग्लेन मॅक्सवेल असा फलंदाज नाही की, तो नेहमी मॅच फिनिश करतो, अशी त्याची ख्याती. लोअर ऑर्डरमध्ये येऊन फटकेबाजी, दे दणादण बॅटिंग ही त्याची खासियत. तो कधी 15-20 चेंडूत खेळ बदलेल किंवा कधी विकेट टाकून जाईल याचा नेम नसतो. त्याच्यावर भरवसा ठेवता येईल अशा फलंदाजांमध्य मॅक्सवेलची गिनती होत नाही. पण काल अफगाणिस्तान विरुद्ध मॅक्सवेल वाघासारखा खेळला. त्याच्या बॅटच्या गर्जनेने मॅचच्या अखेरीस अफगाणिस्तानची पार मांजर झाली होती. पायात क्रॅम्प गोळे आले, तो मैदानावर धावू सुद्धा शकत नव्हात. क्रॅम्पमुळे तो मैदानात लोळला, वेदनेने विव्हळला, पण टीमला गरज असताना मैदान सोडलं नाही. फायटर कसा असतो ते क्रिकेट विश्वाला दाखवून दिलं.
हेच ग्लेन मॅक्सवेल काल सर्वांना शिकवून गेला
एक धावही काढण शक्य नव्हतं, त्या परिस्थितीतही तो मैदानावर उभा राहिला, हँड-आय समन्वयाने चेंडू सीमारेषेपार पाठवले. खाली विकेट नाहीयत, हे त्याला ठाऊक होतं. त्यामुळे तो मैदानात उभा राहिला व ऑस्ट्रेलियाला जिंकवून विजयी वीरासारखा ड्रेसिंग रुममध्ये परतला.128 चेंडूत नाबाद 201 धावा त्याने द्विशतक झळकावलं. 21 फोर, 10 सिक्स ही त्याची इनिंगच सर्वकाही सांगून जाते. क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं, असं का म्हटलं जातं, ते कालच्या सामन्यावरुन स्पष्ट झालं. मॅक्सवेलची इनिंग ही खूप काही शिकवून जाणारी आहे. अगदी आपल्या रोजच्या जगण्यातही आपल्याला त्यातून प्रेरणा मिळू शकते. मॅच कुठलीही असो क्रिकेटची किंवा व्यक्तीगत जीवनातली. मॅच सोडायची नसते, लढायच असतं, हेच ग्लेन मॅक्सवेल काल सर्वांना शिकवून गेला.