IND vs AUS Test Series: भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन टीमची घोषणा, ‘या’ प्लेयर्सना टीममध्ये मिळालं स्थान
IND vs AUS Test Series: फेब्रुवारी-मार्च दरम्यान भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची सीरीज खेळली जाईल. या सीरीजसाठी ऑस्ट्रेलियन टीमची घोषणा झाली.
India vs Australia Test Series: ऑस्ट्रेलियाने आगामी भारत दौऱ्यासाठी 18 सदस्यीय टीम घोषित केली आहे. या टीममध्ये ऑस्ट्रेलियाने चार स्पिनर्सना संधी दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्क पहिल्या नागपूर टेस्ट मॅचमध्ये खेळणार नाहीय. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची सीरीज फेब्रुवारी-मार्च दरम्यान खेळली जाईल.
‘हा’ प्रमुख गोलंदाज टीमच्या बाहेर
मिचेल स्टार्कला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिगं डे टेस्ट मॅच दरम्यान हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो सीरीजच्या शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही. 9 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीत मिचेल स्टार्क खेळणार नसल्याच ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सनी बुधवारी स्पष्ट केलं. दिल्ली कसोटीपासून तो टीम इंडियाशी जोडला जाईल. ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीनला सुद्धा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाली होती. कॅमरुन ग्रीन पहिल्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीमसोबत येणार आहे.
‘या’ 4 स्पिनर्सना दिली जागा
भारतातील खेळपट्टया फिरकी गोलंदाजांना अनुकूल आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने टेस्टसाठी नॅथन लियोन, एश्टन एगर, मिचेल स्वेप्सन आणि टॉड मर्फी यांची निवड केलीय. मॅथ्यू रेनशॉ आणि पीटर हँड्सकॉम्ब बॅक-अप बॅट्समन असतील. मार्कस हॅरिसला टीममध्ये संधी मिळालेली नाही. एलेक्स कॅरीसाठी दुसरा बॅकअप विकेटकीपर निवडलेला नाही. गरज पडल्यास हँड्सकॉम्बवर जबाबदारी सोपवली जाईल.
बोलँडला टीममध्ये संधी
लांस मॉरिसला टीममध्ये कायम ठेवलय. नागपूरमध्ये स्टार्कच्या अनुपस्थितीत अतिरिक्त वेगवान गोलंदाज हवा असेल, तर मॉरिसला संधी मिळेल. त्याशिवाय स्कॉट बोलँडला सुद्धा संधी मिळालीय.
ऑस्ट्रेलियन चीफ सिलेक्टर म्हणाले….
“सिडनीमध्ये पुनरागमन केल्यानंतर एश्टन एगरने प्रभावित केलय. स्पिन बॉलिंग भारतीय कंडीशन्समध्ये महत्त्वपूर्ण ठरेल. मिचेल स्वेप्सनकडे उपखंडात खेळण्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे लेग स्पिनमध्ये वैविध्य येईल. टॉड मर्फीने देशांतर्गत क्रिकेट आणि ऑस्ट्रेलिया ए कडून खेळताना प्रभावित केलय” असं चीफ सिलेक्टर जॉर्ज बेली म्हणाले. भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन टेस्ट टीम:
डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीवन स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिंस (कॅप्टन), मिचेल स्टार्क, नाथन लियोन, जॉश हेजलवूड, स्कॉट बोलँड, लांस मॉरिस, एश्टन एगर, मिचेल स्वेप्सन, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब