Shane Warne Death: शेन वॉर्नचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, मृतदेहाजवळ ती महिला कोण होती?
Shane Warne Death: शेन वॉर्नच्या अकाली मृत्यूमुळे विविध शंका-कुशंका व्यक्त होत होत्या. विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. आता या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील.
सिडनी: जागतिक क्रिकेटमधील एका महान लेग स्पिनरला जग मुकलं आहे. मागच्या आठवड्यात शेन वॉर्नचं (Shane warne) दुर्देवी निधन झालं. वयाच्या 52 व्या शेन वॉर्नने थायलंडमधल्या एक व्हिलात (Thailand villa) अखेरचा श्वास घेतला. तिथे तो मित्रांसमवेत सुटट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक वॉर्नच निधन झालं. शेन वॉर्नच्या अकाली मृत्यूमुळे विविध शंका-कुशंका व्यक्त होत होत्या. विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. आता या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. शेन वॉर्नचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट (Autopsy reports) समोर आला आहे. शेन वॉर्नचा ह्दयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम मिळेल. “आज तपसाकर्त्यांना शेन वॉर्नचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला. त्यात शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे” थायलंड पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
रुग्णवाहिकेत वॉर्नच्या मृतदेहाजवळ गेलेली ती महिला कोण ?
शेन वॉर्नच्या मृतदेहाजवळ एका जर्मन महिलेने सुरक्षा नियमांच उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. ती चित्रफीत पोलिसांच्या हाती लागली आहे. थायलंडच पोलीस त्याचाही तपास करत आहेत. शेन वॉर्नचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर एक महिला रुग्णवाहिकेत गेली होती. ती एकटीच अर्धा मिनिट आतमध्ये होती. रुग्णवाहिकेमध्ये शिरताना तिच्या हातात फुलांचा एक पुष्पगुच्छही होता. ती वॉर्नच्या मृतदेहाजवळ अर्धा मिनिट थांबली होती. एबीसी न्यूजने हे वृत्त दिलं आहे.
रुममध्ये आढळले रक्ताचे डाग
ऑस्ट्रेलियात असतानाच शेन वॉर्नच्या छातीत वेदना होतं होत्या. शेन वॉर्नच्या खोलीत रक्ताचे डाग सुद्धा आढळले आहेत. हे रक्त शेन वॉर्नचच आहे. कारण सीपीआर ट्रीटमेंट देत असतानाच त्याच्या तोंडातून हे रक्त पडलं होतं. शेन वॉर्नच्या मृत्यू संशयास्पद नसल्याचं थायलंड पोलिसांचं मत आहे.
शेन वॉर्न त्याच्या तीन मित्रांसोबत तीन महिने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थायलंडच्या कोह समुई बेटावर गेला होता. तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. वॉर्नचा मित्र त्याला जेवण्यासाठी म्हणून बोलवायला गेला, त्यावेळी तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या मित्रांनीच लगेच त्याला सीपीआर ट्रीटमेंट दिली. पण वॉर्नला वाचवता आलं नाही. प्रॉविंशियल पोलिसांचे कमांडर सतित पॉल्पिनित यांनी वॉर्नच्या खोलीत रक्ताचे डाग आढळल्याचं सांगितलं.
सर्वात आधी तिथे पोहोचलेल्या रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्याने काय पाहिलं?
अखेरच्या क्षणी शेन वॉर्न सोबत त्याचे मित्र होते. सर्वप्रथम वॉर्नच्या मित्रानेच त्याला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं. दुपारच्या जेवणासाठी म्हणून तो शेन वॉर्नला बोलवायला त्याच्या रुममध्ये गेला होता. अनेक हाका मारुनही शेन वॉर्न काहीच प्रतिसाद देत नव्हता. “आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी आम्ही शेन वॉर्नला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं” असं रुग्णावाहिकेच्या कर्मचाऱ्याने सांगितलं. शेन वॉर्नच्या मित्राने त्याला सीपीआर देऊन त्याचा श्वासोश्वास सुरु करण्याचा प्रयत्न केला. आम्ही थाय इंटरनॅशनल हॉस्पिटलकडेही मदत मागितली, असे शेन वॉर्नसोबत असलेल्या मित्राने सांगितले. सेवन न्यूज डॉट. कॉमने हे वृत्त दिलं आहे.