IND vs AUS: टीम इंडियाचा ‘हा’ गोलंदाज कांगारुंना शेवटपर्यंत नाही कळला, आता दक्षिण आफ्रिकेचं काय होणार?
ऐन T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियासाठी ही एक चांगली बाब आहे....
मुंबई: टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन T20 सामन्यांची सीरीज 2-1 अशी जिंकली. टीम इंडियाने विजय मिळवला असला, तरी गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. अक्षर पटेल वगळता टीम इंडियाचे अन्य गोलंदाज प्रभाव पाडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाला टी 20 सीरीजमध्ये अक्षर पटेल कळलाच नाही. अक्षरने त्याच्या फिरकीच्या तालावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलच नाचवलं.
किती विकेट घेतल्या?
अक्षरने संपूर्ण सीरीजमध्ये 7.87 च्या सरासरीने 6.30 च्या स्ट्राइक रेटने एकूण 8 विकेट घेतल्या. अक्षर प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचा मानकरी ठरला. मोहाली, नागपूर आणि हैदराबाद या तिन्ही विकेटवर ऑस्ट्रेलियन फलंदाज समर्थपणे अक्षरच्या गोलंदाजीचा सामना करु शकले नाहीत.
ऑस्ट्रेलिया झाली आता दक्षिण आफ्रिकेची टीम आहे. तीन टी 20 सामन्यांच्या सीरीजसाठी दक्षिण आफ्रिकेची टीम भारत दौऱ्यावर आली आहे. 28 सप्टेंबरपासून दोन्ही टीम्समध्ये टी 20 सीरीज सुरु होणार आहे.
जाडेजाची कमतरता जाणवू दिलेली नाही
अक्षर पटेलला रवींद्र जाडेजाच्या जागी टीममध्ये स्थान मिळालय. त्याने अजूनपर्यंत जाडेजाची कमतरता जाणवू दिलेली नाही. आशिया कप स्पर्धेच्यावेळी रवींद्र जाडेजाला दुखापत झाली होती. त्यानंतर अक्षर पटेलला संधी मिळाली. सध्या तो कमालीच प्रदर्शन करतोय.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20 मॅचमध्य अक्षर पटेलने एरॉन फिंच, जोश इंग्लिंस आणि मॅथ्यू वेडला आऊट केलं. तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 33 धावा देऊन 3 मोठ्या विकेट काढल्या.
फिल्डिंगमध्येही कमाल
शानदार गोलंदाजीशिवाय अक्षरने फिल्डिंगमध्येही कमाल केली. टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला रनआऊट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 8 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर त्याच्या एका थ्रो ने बेल्स हलल्या होत्या. दुसरी बेल्स दिनेश कार्तिकने पाडली. त्यानंतर मॅक्सवेल रनआऊट झाला. अक्षरची गोलंदाजी खेळताना ऑस्ट्रेलियन बॅट्समन चाचपडताना दिसले. फिंचने 7, जोशने 24 आणि वेडने अवघा 1 रन केला.