BAN vs NED: अरेरे, नेदरलँडची टीम लढली पण थोडक्यात बांग्लादेश विरुद्ध विजयाची संधी हुकली
BAN vs NED: टीम इंडियासारखीच आजच्या मॅचमध्ये नेदरलँडची स्थिती झाली होती, त्यांनी सुद्धा....
होबार्ट: बांग्लादेशने टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) विजयी सुरुवात केली आहे. होबार्टच्या (Hobart) बॅलेरिवे ओव्हल स्टेडियमवर बांग्लादेश आणि नेदरलँडमध्ये (Bangladesh vs Netherland) मॅच झाली. नेदरलँडसने हा सामना 9 धावांनी गमावला. बांग्लादेशने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 8 विकेट गमावून 144 धावा केल्या. नेदरलँडसच्या टीमनेही बांग्लादेशला चांगली लढत दिली. पण ते विजय मिळवू शकले नाहीत. नेदरलँडसची टीम संपूर्ण 20 ओव्हर खेळून 135 रन्सवर ऑलआऊट झाली.
बांग्लादेशकडून कोण चांगलं खेळलं?
बांग्लादेशसाठी तस्कीन अहमदने चार ओव्हरमध्ये 25 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. नेदरलँडसकडून कॉलिन एकरमॅनने 62 धावा फटकावल्या. त्याने 48 चेंडूत या धावा केल्या. त्याने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. नेदरलँडसकडून अन्य फलंदाज दमदार कामगिरी करू शकले नाहीत.
नेदरलँडसने मॅच नाही सोडली
145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडसने 15 धावात 4 विकेट गमावल्या होत्या. पण त्यांनी हार मानली नाही. ते लढले. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्सने कॉलिनला साथ दिली. टीमची धावसंख्या 50 च्या पुढे नेली. एडवर्ड्सला 16 रन्सवर शाकिब अल हसनने आऊट केलं. 101 धावांवर नेदरलँडसने आपल्या 9 विकेट गमावल्या होत्या.
कॉलिनही तंबूत परतला होता. पण तरीही नेदरलँडसने बांग्लादेशला मोकळीक दिली नाही. पॉल वान मीकेरेनने डावाच्या शेवटी वेगाने धावा फटकावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश मिळालं नाही. 14 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 24 धावा केल्या.
फलंदाजी बांग्लादेशची कमजोरी
बांग्लादेशने भले हा सामना जिंकला असेल, पण फलंदाजी त्यांचा कमकुवत दुवा ठरला. नेदरलँडस सारख्या टीमसमोर ते मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. कोणी एकही अर्धशतक झळकावलं नाही. बांग्लादेशकडून अफिक हुसैनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 38 धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.