IPL मधून अधिक पैसा कमावण्यासाठी BCCI लाईव्ह सामन्यांदरम्यान करणार बदल?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. क्रिकेट मंडळाला श्रीमंत करण्यात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) या स्पर्धेचा मोठा वाटा आहे. क्रिकेट मंडळ आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क विकून हजारो कोटी रुपये कमावते.
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. क्रिकेट मंडळाला श्रीमंत करण्यात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) या स्पर्धेचा मोठा वाटा आहे. क्रिकेट मंडळ आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क विकून हजारो कोटी रुपये कमावते. यंदा बीसीसीआय यात बदल करणार आहे. प्रसारणाचे हक्क विकताना अधिक पैसे कमावण्यासाठी मंडळाने नामी शक्कल लढवली आहे. बीसीसीआयने स्पर्धेच्या तारखा आणि नवीन स्वरूप जाहीर केल्याने स्पर्धेबाबत वातावरण निर्माण झाले आहे. पूर्ण कार्यक्रम अजून येणे बाकी आहे, तो काही दिवसांत स्पष्ट होईल. देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे मंडळासमोर स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्याचे ध्येय आहे. पण याशिवाय बीसीसीआयसमोर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे या स्पर्धेचे प्रसारण हक्क (IPL Broadcasting Rights) विकण्याचा. म्हणजेच सामने कोणत्या चॅनलवर किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहता येणार. सध्याचा सीझन स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर पाहता येईल, पण पुढच्या सीझनपासून परिस्थिती बदलू शकते आणि केवळ स्टारच नाही तर आयपीएलचे सामने 2-3 वेगवेगळ्या चॅनलवर प्रसारित केले जाण्याची शक्यता आहे.
2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक मोसमात फक्त एकाच ब्रॉडकास्टरला टूर्नामेंट दाखवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सुरुवातीच्या काळात, सोनी नेटवर्क आयपीएलचे प्रसारण करत होते, तर गेल्या काही हंगामात, स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे प्रसारणाचे अधिकार होते. आयपीएल टेलिकास्टचे सध्याचे चक्र या हंगामात संपुष्टात येत आहे आणि बोर्ड पुढील हंगामासाठी नवीन मीडिया अधिकारांची प्रक्रिया सुरू करणार आहे, ज्यातून बीसीसीआयला मोठ्या कमाईची अपेक्षा आहे.
स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा कालावधी वाढवणार?
बीसीसीआय केवळ प्रसारकांकडून अधिक पैसा कमावण्याच्या प्रयत्नात नाही तर त्यांच्या कमाईचे साधन वाढवण्याच्या योजनेवरही काम करत आहे. या अंतर्गत, मंडळ सामन्यांमधील स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा कालावधी वाढवण्याच्या विचारात आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा कालावधी सध्या 150 सेकंद म्हणजेच 2.5 मिनिटे इतका आहे. परंतु पुढील वर्षीपासून हा कालावधी 30-30 सेकंदांनी वाढवून 3-3 मिनिटे केला जाऊ शकतो. अशाप्रकारे, एका सामन्यातील 4 स्ट्रॅटेजिक टाइमआऊट्सदरम्यान 2 मिनिटांचा अतिरिक्त वेळ जाहिरातींसाठी उपलब्ध असेल. त्याद्वारे ब्रॉडकास्टिंग कंपन्या अधिक पैसे कमावू शकतील.
अधिक चॅनेल, अधिक कमाई
क्रिकबझच्या अहवालानुसार, यावेळी सर्व अधिकार एका ब्रॉडकास्टरला देण्याऐवजी, भारतीय बोर्ड बोली लावणाऱ्यांपैकी 3-4 कंपन्यांना समान किंवा वेगळ्या प्रमाणात सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क वितरित करू शकते. जितक्या जास्त कंपन्या (ब्रॉडकास्टर) असतील तितकी कमाई जास्त होईल, असा बोर्डाला विश्वास आहे. या प्रक्रियेचा अवलंब केल्यास नवीन करारातून 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळेल, असा बोर्डाला विश्वास आहे. अहवालानुसार, स्टार व्यतिरिक्त, सोनी, रिलायन्स ग्रुप (चॅनेल अद्याप लॉन्च करणे बाकी आहे) आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Amazon Prime Video नवीन डीलसाठी बोली लावतील. पण कोणत्याही एकाला सर्व हक्क मिळण्याऐवजी प्रत्येकाला थोडा-थोडा वाटा मिळेल.
सध्या, इंग्लंडच्या प्रसिद्ध फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये अशी परंपरा आहे, ज्यामध्ये 3-4 वेगवेगळ्या प्रसारकांना वेगवेगळ्या सामन्यांच्या प्रसारण अधिकार आहेत. बोर्डही त्या बाजूने झुकताना दिसत आहे, परंतु बोली लावणारे प्रसारक यासाठी तयार होतील की नाही, हे स्पष्ट नाही. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. असे मानले जात आहे की, या अंतर्गत, मंडळ मुख्यतः वीकेंडच्या सामन्यांचे अधिकार वेगळे विकण्याचा विचार करु शकतं. वीकेंडला तब्बल 32 सामने खेळवले जाणार आहे. हे सामने एकाच वेळी वेगवेगळ्या वाहिन्यांवर दाखवले जाऊ शकतात.
इतर बातम्या
Rohit Sharma: ‘रोहित शर्मा आज संघात आहे कारण…’ एका मोठ्या क्रिकेटपटूने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
Russia Ukraine War: रशियन फौजांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं केविन पीटरसनचं कुटुंब