Virat Vs BCCI | ‘बास झालं, अजून ताणू नका’ कॅप्टन्सी वादावर प्रश्न विचारताच दादा वैतागला!
गेल्या दोन दिवसांपासून विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्यावरुन केलेल्या वक्तवांमुळे चर्चांना उधाण आलंय.
कोलकाता : बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) विराट कोहली आणि कर्णधारपदावरुन (#captaincy) सुरु झालेल्या वादावर वक्तव्य करताना हा वाद आणखी न ताणण्याचं आवाहन केलंय. माध्यमांशी बोलताना सौरव गांगुलीनं कॅप्टन्सीवरुन सुरु झालेला वाद बीसीसीआय आपल्या पातळीवर सोडवेल, असंही म्हटलंय. कोलकातामध्ये (Kolkata) पत्रकारांशी बोलताना भारताचा माजी कर्णधार आणि बीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं हे विधान केलंय.
Let’s not take this further. I have nothing to speak. This is a BCCI matter and it will deal with it: BCCI President Sourav Ganguly in Kolkata on #ViratKohli pic.twitter.com/UtkBkBjpRW
— ANI (@ANI) December 17, 2021
कोण खरं? कोण खोटं?
कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa tour) रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने (Virat kohli) टी-20 चे कर्णधारपद सोडण्यापासून ते वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याबाबतच्या घटनाक्रमावर महत्त्वाची माहिती दिलेली. विराटने टी-20 चं कर्णधारपद सोडण्यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे नेमकं खरं कोण बोलतय, असा प्रश्न निर्माण झालाय.
कोहली विरुद्ध बीसीसीआय?
कोहलीने गांगुलीचे वक्तव्य खोडून काढलं होतं. टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या माझ्या निर्णयाचा बीसीसीआयने स्वीकार केलेला. निवड समिती सदस्य किंवा अन्य कोणीही मला माझ्या निर्णयाचा पूनर्विचार करण्यास सांगितलं नव्हतं, असे विराट म्हणाला होता.
टी-20 संघाचे कर्णधारपद सोडताना विराटने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. वनडे संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत पदाधिकारी आणि निवड समिती सदस्यांचा कुठलाही निर्णय आपल्याला मान्य असेल, असे कोहलीने बीसीसीआयला आधीच सांगितले होते. बुधवारी पत्रकार परिषदेत घेत कोहलीने ही माहिती दिली होती.
कोहलीचं ‘विराट’ वक्तव्य!
“टी-20 चे कर्णधारपद सोडण्याबाबत मी बीसीसीआयशी संपर्क साधला, त्यावेळी मी माझी बाजू त्यांना सांगितली. माझ्या निर्णयामागे ही कारणं आहेत, हे मी सांगितलं होतं. चांगल्या पद्धतीने हा निर्णय स्वीकारला गेला. मी टी-20 चे कर्णधारपद सोडू नये, असे कोणी मला सांगितले नाही” असंही कोहली म्हणाला होता.
गांगुली काय म्हणाला होता?
पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बिलकुल या उलट विधानं केल्यानं नवा वाद उफाळून आला होता. “मी विराट कोहलीला टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नको, असं विधान केल्याचा दावा सौरव गांगुलीनं केला होता. विराटने मात्र बुधवारी वेगळाच दावा केल्यानं अनेकांनी बीसीसीआयमध्ये सगळं काही आलबेल नाही, यावरुन तर्क वितर्क लावले होते. टी-20 चं कर्णधारपद सोडताना बीसीसीआयमधून कोणी आपल्याला अडवलं नाही. उलट हा निर्णय व्यवस्थित स्वीकारला असं विराटनं सांगितलं होतं. त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतय, हा प्रश्न निर्माण झाला होता.
दादा म्हणतो… ‘बास करा, ताणू नका!’
कॅप्टन्सी वादावरुन करण्यात आलेल्या सगळ्या दाव्या आणि प्रतिदाव्यांवरुन अखेर कोलकातामध्ये पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सौरव गांगुलीनं हा वाद बीसीसीआय मिटवेल, असं म्हटलंय. इतकंच काय तर हा सगळा वाद आणखी ताणण्याची गरज नसल्याचंही सौरव गांगुलीनं म्हटलंय.
संबंधित बातम्या –
‘रोहित आणि माझ्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही, हे वारंवार सांगून आता मी थकलोय’