रोहित, विराट, पंड्या आणि शमी वर BCCI नाराज, कारण, प्रत्येक वेळी या खेळाडूंची असते एकच मागणी
BCCI आणि सिलेक्टर्स टीम इंडियातील मोठ्या खेळाडूंवर नाराज असल्याची माहिती आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि मोहम्म शमी या खेळाडूंचा एक निर्णय बीसीसीआयला पटलेला नाही.
मुंबई: BCCI आणि सिलेक्टर्स टीम इंडियातील मोठ्या खेळाडूंवर नाराज असल्याची माहिती आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि मोहम्म शमी या खेळाडूंचा एक निर्णय बीसीसीआयला पटलेला नाही. या चारही खेळाडूंचा विश्रांती घेण्याचा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीला पटलेला नाही. याच निर्णयामुळे या खेळाडूंची वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड केलेली नाही. बीसीसीआय आणि सिलेक्टर्सनी नाराजी व्यक्त करताना हे खेळाडू नाममात्र सामनेच भारतासाठी खेळले आहेत, असं म्हटलय. रोहित शर्मा, (Rohit Sharma) विराट कोहली (Virat kohli) आणि हार्दिक पंड्या यांनी एका मोठ्या सुट्टीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलय. पण त्यानंतरही या खेळाडूंनी वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी आराम मागितला. रोहित शर्मा, विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या देशांतर्गत टी 20 सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली होती. हार्दिक पंड्या तर बरेच महिने दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेद्वारे संघात पुनरागमन केलय.
प्रत्येक सिलेक्शन मीटिंगमध्ये ‘या’ खेळाडूंची आरामाची मागणी
“प्रत्येक सिलेक्शन मीटिंगमध्ये खेळाडुंच्या वर्कलोडचा मुद्दा उपस्थित होतो. रोहित, कोहली, पंड्या, बुमराह आणि शमी प्रत्येक बैठकीत विश्रांतीची मागणी करतात. या खेळाडूंना आराम हवा असतो. ट्रेनर आणि फिजियो टीम मॅनेजमेंटला जी नोट पाठवतात, त्यात या खेळाडूंच्या विश्रांतीचा मुद्दा असतो” असं बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलय.
सूत्रांनी सांगितलं की, “हे खेळाडू प्रत्येक दुसऱ्या सीरीजमध्ये बाहेर बसतायत. बीसीसीआय सोबत हे सर्व खेळाडू करारबद्ध आहेत. रोहित शर्मा फुल टाइम कॅप्टन झाल्यापासून नाममात्र सामने खेळला आहे. पंड्याने आता खेळायला सुरुवात केली आहे. बुमराह आणि शमी सुद्धा निवडक सामने खेळतायत. कोहलीला सुद्धा आता प्रत्येक सीरीजनंतर आराम हवा आहे. पंत असा एकमेव खेळाडू आहे, ज्याने मागच्या दोन वर्षात भारताकडून सर्वाधिक सामने खेळलेत”
वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 मध्ये कोणाची निवड होईल?
रोहित, बुमराह, पंत आणि पंड्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी संघात निवडलं जाणं, जवळपास निश्चित आहे. इंग्लंड विरुद्ध विराट कोहली कशी कामगिरी करतो, त्यावर त्याचं वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणं अवलंबून आहे.