मुंबई: विराट कोहली (Virat kohli) आता कुठल्याच फॉर्मेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार नसेल. विराट कोहलीने आज संध्याकाळी अचानक कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊन कोट्यावधील क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला. याआधी विराटने टी-20 ची कॅप्टनशिप सोडली होती. वनडेमध्ये निवड समितीने विराटला हटवून रोहितला (Rohit sharma) कर्णधार बनवले होते.
विराट कोहलीने राजीनाम्यात काय म्हटलय?
संघाला एका योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्ष अखंड मेहनत घेतली. त्यासाठी अविरतपणे झटलो. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अंत असतो. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आता आली आहे. या प्रवासात मी अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. पण कधीच कुठे कशाची कमी भासणार नाही, यासाठी मनापासून पूर्ण प्रयत्न केले. कोणतीही गोष्ट 120 टक्के क्षमतेनं करायची, या विचाराचा मी आहे. त्याच विचारानं मी काम केलं. पण जर त्याच क्षमतेनं मी एखादी गोष्ट करु शकत नसेन, तर योग्य वेळी जबाबदारीतून स्वतःला मोकळं करणं भाग आहे. अर्थात असं करणं योग्य नाही, याचीही मला जाणीव आहे. पण या बाबतीत मी स्वतःची आणि माझ्या संघाची फसवणूक करु शकत नाही. मनापासून विचार केल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे.
बीसीसीआयने दिल्या शुभेच्छा
विराटच्या या टि्वटनंतर बीसीसीआयने टि्वट करुन त्याला शुभेच्छा दिल्या. कालच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा 2-1 ने पराभव झाला होता. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेत जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण
भारताचं दक्षिण आफ्रिकेत जिंकण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. सेंच्युरियनची पहिली कसोटी जिंकली. त्यानंतर जोहान्सबर्ग आणि केपटाऊनमध्ये पराभव झाला. सेंच्युरियनच्या विजयामुळे आशा पल्लवित झाल्या होत्या. मागच्या सहा कर्णधारांना 1992 पासून 29 वर्षात जे जमलं नाही, ते विराटचा संघ करुन दाखवेल, असं वाटतं होतं. पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.
विराटने कॅप्टनशिप सोडल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत
विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. पण त्याचा खराब फॉर्म हे सुद्धा त्यामागे कारण असू शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला मागच्या दोन वर्षात शतक झळकावता आलेलं नाही. कधीकाळी विराटची सचिन बरोबर तुलना होत होती. विराट सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडेल, असं बोललं जात होतं. पण विराटच्या मागच्या दोन वर्षांपासून 70 शतकांवरच अडकला आहे.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
त्याशिवाय अजूनही अनेक प्रश्न विराटच्या निर्णयामुळे निर्माण झालेत. भारतीय क्रिकेटमध्ये सर्व काही आलबेल आहे का? हा प्रश्न आहे. विराटने नाराज असल्यामुळे हा निर्णय घेतलाय? विराटवर कुठला दबाव होता? विराटने निर्णय घेताना घाई केली? हे प्रश्न विराटच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेत.