BCCI ने दिला झटका, पाकिस्तानी टीम विरुद्ध नाही खेळणार भारतीय संघ
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) बंगाल क्रिकेट टीमला झटका दिला आहे. बंगालचा संघ नामीबिया येथे एका ग्लोबल टी 20 टुर्नामेंट (T 20 Tournament) मध्ये खेळणार होता.
मुंबई: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) बंगाल क्रिकेट टीमला झटका दिला आहे. बंगालचा संघ नामीबिया येथे एका ग्लोबल टी 20 टुर्नामेंट (T 20 Tournament) मध्ये खेळणार होता. पण बीसीसीआयने आता त्या मध्ये अडथळा आणला आहे. बीसीसीआयने बंगालच्या संघाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळेच बंगालच्या संघाने (Bengal Team) या स्पर्धेतून आपलं नाव मागे घेतलं आहे. बीसीसीआय आपल्या पुरुष खेळाडूंना परदेशातील टी 20 स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. बंगालच्या संघाला परवानगी नाकारण्यामागे हेच कारण आहे.
अन्य देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आपल्या क्रिकेटर्सना दुसऱ्या देशांच्या टी 20 लीग स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली आहे. पण भारतीय क्रिकेटपटूंना अशी सुविधा अजून मिळालेली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू दुसऱ्या देशाच्या टी 20 स्पर्धांमध्ये खेळत नाही. परवानगी नाकारण्यामागे या स्पर्धेचा फॉर्मेट एका कारण असू शकतं, असं मत बंगाल क्रिकेट संघाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केलं.
पाकिस्तानी संघाविरुद्ध होणार होता सामना
नामीबियात होणाऱ्या या स्पर्धेत बंगालचा संघ नामीबिया, पाकिस्तान सुपर लीगची टीम लाहोर कलंदर्स आणि दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक संघाविरुद्ध खेळणार होता. 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार आहे. आता बंगालने या स्पर्धेतून नाव मागे घेतलं आहे. सीएबीने 22 जुलैला आपल्या संघाची घोषणा केली होती. या संघात आकाशदीप, मुकेश कुमार, इशान पोरेल, शाहबाज अहमद, रितिक चॅटर्जीला संघात स्थान मिळालं होतं.
वर्ल्ड कपची तयारी करण्याचा नामीबियाचा प्रयत्न
या स्पर्धेच्या माध्यमातून टी 20 वर्ल्ड कप 2022 ची तयारी करण्याचा नामीबियाचा प्रयत्न आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. मागच्यावर्षी यूएईत झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर-12 मध्ये स्थान मिळवण्यात नामीबियाचा संघ यशस्वी ठरला होता. यावेळी चांगली कामगिरी करण्याचा नामीबियाचा प्रयत्न असेल. नामीबियाचा संघ वनडे वर्ल्ड कप मध्ये खेळला आहे. 2003 वर्ल्ड कप मध्ये नामीबियाचा समावेश होता.