Ranji Trophy 2022: बंगालच्या क्रीडा मंत्र्यांचं रणजी सामन्यात दमदार शतक, टीमची सेमी फायनलमध्ये धडक
झारखंडविरुद्धच्या पहिल्या डावातील प्रचंड आघाडीच्या जोरावर बंगालने उपांत्य फेरी गाठली. या सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ केवळ औपचारिकता होती, त्यात तिवारीने 136 धावा केल्या होत्या. आपल्या क्षेत्रातील संबंधित फायलींवर स्वाक्षरी करण्यासोबतच मनोज तिवारीने आपल्या खेळीत 19 चौकार आणि दोन षटकार खेचत मैदानावरील फलंदाजीची देखील चुणूक दाखवली.
बंगळूर: बंगालचे क्रीडामंत्री मनोज तिवारी (West Bengal Sports Minister) यांनी आज, शुक्रवारी रणजी करंडक (Ranji Trophy)स्पर्धेत 88 वर्षांत इतर कोणालाही जे करता आले नाही, ते साध्य केले. राज्याचे क्रीडामंत्री म्हणून शतक ठोकणारा मनोज पहिलाच खेळाडू ठरला. झारखंडविरुद्धच्या (Jharkhand)पहिल्या डावातील प्रचंड आघाडीच्या जोरावर बंगालने उपांत्य फेरी गाठली. या सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ केवळ औपचारिकता होती, त्यात तिवारीने 136 धावा केल्या होत्या. आपल्या क्षेत्रातील संबंधित फायलींवर स्वाक्षरी करण्यासोबतच मनोज तिवारीने आपल्या खेळीत 19 चौकार आणि दोन षटकार खेचत मैदानावरील फलंदाजीची देखील चुणूक दाखवली.
पहिल्या डावात बंगालने 773 धावा केल्या
संघाकडून शाहबाज अहमदने 46, अनुस्तुप मजूमदारने 38 आणि अभिषेक पोरेलने 34 धावा केल्या. या तिघांनीही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली होती. एकतर्फी उपांत्यपूर्व फेरीत बंगालने पहिल्या डावात सात गडी गमावून 773 धावा केल्या. या खेळीसह बंगाल संघाच्या 9 फलंदाजांनी अर्धशतके झळकावत प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 250 वर्षांच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला. झारखंडकडून शाहबाज नदीमने 59 धावांत पाच विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर पहिल्या डावात विराट सिंहने 136 धावा केल्या.
उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 14 जूनपासून होणार
उपांत्य फेरीत बंगालच्या संघाचा सामना आता मध्य प्रदेश संघाशी होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबईचा सामना उत्तर प्रदेश संघाशी होणार आहे. या दोन्ही उपांत्य लढती 14 जूनपासून खेळवल्या जाणार आहेत.
संक्षिप्त स्कोअर
बंगाल: पहिला डाव : 773/7 घोषित (सुदीपकुमार घरामी 186, अनुस्तुप मजुमदार,117 , शाहबाज अहमद 78, मनोज तिवारी 73; सुशांत मिश्रा 3/140, शाहबाज नदीम 2/175) झारखंड पहिला डाव : सर्वबाद 298 (विराटसिंग नाबाद 113, नाझीम सिद्दिकी 53; शाहबाज अहमद 4/51, सायन मोंडल 4/71) बंगाल दुसरा डाव : 318/7 (मनोज तिवारी नाबाद 136, शाहबाज अहमद 46, अनुस्तुप मजुमदार 38; शाहबाज नदीम 5/59).