IND vs AFG | रोहित-विराट यांच्या पलीकडे पाहण्याची राहुल द्रविड यांच्यामध्ये हिम्मत नाही का?
IND vs AFG | निर्णय घेण्यासाठी हिम्मत लागते. भारतीय क्रिकेटमध्ये स्टार कल्चर आहे. याच स्टार कल्चरने अनेकदा टीमला बुडवलय. कारण यामध्ये प्रतिभावान खेळाडूंना न्याय मिळत नाही. आता अफगाणिस्तान विरुद्धच्या सीरीजमध्ये विराट कोहलीची टीममध्ये निवड झाली. पण त्यामुळे एका टॅलेंटेड युवा खेळाडूला बाहेर बसाव लागलं. हेड कोच राहुल द्रविड यांच्याकडे या प्रश्नाच उत्तर आहे का?

IND vs AFG | टीम इंडियाने काल अफगाणिस्तान विरुद्धची T20 सीरीज जिंकली. या सीरीजसाठी जवळपास वर्षभराने कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची टीममध्ये निवड झाली होती. या मालिकेत दोघांनी आपली छाप उमटवली. रोहित सीरीजच्या पहिल्या दोन मॅचमध्ये शुन्यावर आऊट झाला. त्यानंतर तिसऱ्या अखेरच्या सामन्यात शतकी खेळी केली. रोहित शर्माने 69 चेंडूत 121 धावा केल्या. यात 11 फोर, 8 सिक्स मारले. त्यानंतर विराटने दुसऱ्या सामन्यात 16 चेंडूत 29 धावा केल्या. यात 5 फोर होते. तिसऱ्या मॅचमध्ये विराट शुन्यावर बाद झाला. दोघांचा परफॉर्मन्स पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांच मत असेल, त्यांचा यावर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये समावेश करावा. पण यात एक वास्तव लक्षात घेतलं पाहिजे, दोघांच्या वयाचा मुद्दा आहेच. पण अजून एक मुद्दा आहे. काल सुपर ओव्हर सुरु होती. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज होती. त्यावेळी नॉन स्ट्राइकवर असलेल्या रोहितने अचानाक रिटायर होण्याचा निर्णय घेतला. रिंकू सिंहला मैदानात बोलावलं. रिंकू जास्त फिट असल्याने तो 2 धावा पळू शकतो, म्हणून कदाचित रोहितने असं केलं असाव.
याचाच अर्थ की रोहित शर्माच्या फिटनेसचा मुद्दा आहे. T20 मध्ये फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे मोठे खेळाडू आहेत, त्यांच्यात क्षमता आहे यात दुमत नाही. पण बीसीसीआयच्या निवड समितीने आणि राहुल द्रविड यांनी भविष्याचा विचार करायचा ठरवलं असेल, तर मग ते मागे का येतात? काही निर्णयांची अमलबजावणी खूप कठोरपणे करावी लागते. त्यात नुकसान होतं. पण भविष्यात फायदा असतो. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा विचार T20 साठी निवड समितीने सोडून दिला होता, मग त्यांना आता अफगाणिस्तान विरुद्धच्या सीरीजसाठी का निवडलं?
विराटमुळे त्याला बाहेर बसाव लागलं
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवडीमुळे ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा आणि इशान किशन या तीन प्लेयरच्या स्थानाला धोका आहे. तिलक वर्मा मोहालीमध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात टीमचा भाग होता. पण नंतरच्या दोन सामन्यात विराटमुळे तिलक वर्माला बाहेर बसाव लागलं. तिलक वर्माने T20 मध्ये आपली प्रतिभा सिद्ध केलीय. विराट कोहली मोठा खेळाडू आहेच. पण भविष्य तिलक वर्मा आहे.
इंग्लंडकडे त्यावेळी दोन टीम होत्या
2022 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. इंग्लंडने टीम इंडियाचा दारुण पराभव केला. त्यानंतर T20 साठी बदलाची चर्चा सुरु झाली. या वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची पुढच्या T20 मालिकासाठी निवड बंद झाली होती. इंग्लंडने तो वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी इंग्लंडकडे दोन टीम होत्या. T20 आणि वनडेचा त्यांचा संघ वेगळा होता. भारताने सुद्धा तसच कराव अशी चर्चा सुरु झालेली.
आणखी दोघांना संधी मिळाली असती
त्या दृष्टीने भारताने सुद्धा टी 20, वनडे आणि टेस्टच्या दृष्टीने वेगळी संघ बांधणी सुरु केली होती. CSK कडून खेळणारा शिवम दुबे इतकी वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. टीम इंडियाकडून संधी मिळाल्यानंतर त्याने, रिंकू सिंहने क्षमता दाखवून दिली. असे बरेच युवा खेळाडू आयपीएलमध्ये आज खेळत आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या स्टार प्लेयरमुळे त्यांच्यासाठी दरवाजे बंद होतात. उद्याचा संघ बांधायचा असेल, तर कठोरपणे निर्णय घ्यावे लागतील. रोहित आणि विराटच्या जागी अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 सीरीजसाठी आणखी दोन युवा खेळाडूंना संधी देता आली असती.