स्टिंग ऑपरेशनमुळे ‘खेळ’ खल्लास, बोलबच्चन महागात पडलं; अखेर चेतन शर्मा यांना द्यावा लागला ‘या’ पदाचा राजीनामा
चेतन शर्मा यांचं एक स्टिंग ऑपरेशन झालं होतं. त्यात त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत काही भाष्य केलं होतं. हेच बोलबच्चन करणं त्यांना महागात पडलं आहे. त्यामुळे त्यांना चीफ सिलेक्टर पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांना अखेर चीफ सिलेक्टर पद सोडावं लागलं आहे. चेतन शर्मा यांनी आज सकाळीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने त्यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारलाही आहे. चेतन शर्मा एका स्टिंग ऑपरेशनमध्ये फसले होते. त्यामुळे त्यांची केव्हाही गच्छंती होणार असल्याचं मानलं जात होतं. मात्र, गच्छंती होण्यापूर्वीच शर्मा यांनी स्वत:हून हे पद सोडलं आहे. गेल्या तीन महिन्यात शर्मा यांना दुसऱ्यांदा हे पद सोडावं लागलं आहे. या आधी टी20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना पदावरून हटवण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर पुढच्याच महिन्यात त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. बीसीसीआयने शर्मा यांना पुन्हा पद बहाल केल्यानंतर बीसीसीआयवर प्रचंड टीकाही झाली होती.
चेतन शर्मा यांचं एक स्टिंग ऑपरेशन झालं होतं. त्यात त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत काही भाष्य केलं होतं. हेच बोलबच्चन करणं त्यांना महागात पडलं आहे. त्यामुळे त्यांना चीफ सिलेक्टर पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांना 7 जानेवारी 2023 रोजी दुसऱ्यांदा चीफ सिलेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. चीफ सिलेक्टर म्हणून ही त्यांची दुसरी टर्म होती. मात्र, अवघ्या 40 दिवसातच त्यांना पदावरून दूर व्हावं लागलं आहे.
स्टिंग ऑपरेशन महागात पडलं
दरम्यान, चेतन शर्मा यांचा एक व्हिडीओ बाहेर आला होता. त्यात त्यांनी खेळाडूंच्या निवडीपासून ते खेळाडूंच्या फिटनेसपर्यंतच्या गोष्टींवर भाष्य केलं होतं. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह सारख्या खेळाडूंवर काही आरोप केले होते.
करिअर सारखाच शेवट
चेतन शर्मा यांच्या चीफ सिलेक्टर पदाचा शेवटही त्यांच्या क्रिकेट करिअरच्या शेवटासारखा झाला आहे. चेतन शर्मा हे उत्कृष्ट गोलंदाज होते. त्यांना आपल्या करिअरमध्ये त्यांना तोंड लपवून फिरावं लागलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांना वेषांतर करून फिरावं लागत होतं.
त्या मॅचने सर्वच बदललं
एका स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा यांची पुरती वाट लागली आहे. एका गोलंदाजीमुळे त्यांना आपल्याच देशात तोंड लपवून राहावं लागलं होतं. त्यांना वेष बदलून राहावं लागलं होतं. 1986मध्ये झालेल्या ऑस्ट्रल-आशिया कपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना झाला होता.
या सामन्यात पाकिस्तानला एका चेंडूत सहा धावांची गरज होती. चेतन शर्मा गोलंदाजी करत होते. जावेद मियांदाद यांनी त्यांच्या चेंडूवर षटकार लगावला होता. त्यानंतर चेतन शर्मा त्यांच्या चाहत्यांच्या नजरेत व्हिलन बनले होते. त्यामुळेच त्यांना वेष बदलून फिरावं लागलं होतं.