टीम इंडियातून बाहेर झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराला ‘या’ संघाने दिला आधार, पाकिस्तानच्या सुपरस्टार खेळाडूसोबत खेळणार
भारताचा स्टार कसोटीपटू चेतेश्वर पुजारासाठी (Cheteshwar Pujara)मागच्या काही महिन्यांपासून खराब काळ सुरु आहे. फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्याचा संघर्ष सुरु आहे.
मुंबई: भारताचा स्टार कसोटीपटू चेतेश्वर पुजारासाठी (Cheteshwar Pujara)मागच्या काही महिन्यांपासून खराब काळ सुरु आहे. फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्याचा संघर्ष सुरु आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सुमार कामगिरीनंतर त्याला संघातून वगळण्यात आलं. परिस्थितीसमोर चेतेश्वर पुजाने शरणागती पत्करलेली नसून संघात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. चेतेश्वर पुजाराने खेळात सुधारणा करण्यासाठी काऊंटीचा आधार घेतला आहे. चेतेश्वर पुजारा यंदा काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये (County Champoinship) सस्सेक्सकडून (Sussex) खेळणार आहे. पुजारासोबत या संघातून एक पाकिस्तानी खेळाडूही खेळणार आहे. सस्सेक्सचा स्टार फलंदाज ट्रेविस हेड यंदा चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होत नाहीय. वाढत्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांमुळे त्याने सस्सेक्ससोबतचा करार संपवला आहे. त्याच्याजागही पुजाराचा संघात समावेश केलाय. काऊंटीनंतर पुजारा लंडनच्या वनडे कॅम्पमध्येही सहभागी होईल. चेतेश्वर पुजाराशिवाय पाकिस्तानचा स्टार खेळाडू मोहम्मद रिजवानही सस्सेक्ससाठी खेळणार आहे.
एका नव्या प्रवासासाठी तयार
“सस्सेक्सच्या संघाकडून खेळायला मिळणार असल्याने मी आनंदी आहे. मी सस्सेक्ससाठी खेळणार आणि त्यांच्या शानदार इतिहासाचा भाग बनणार आहे. मागच्या काहीवर्षांपासून मी युनायटेड किंगडममध्ये खेळण्याचा आनंद घेत आहे. आता एक नव्या प्रवासासाठी तयार आहे” असे चेतेश्वर पुजाराने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
Excited to join the Sussex family, and looking forward to contributing to the Club’s success this county season ? https://t.co/FV5X67O2OW
— cheteshwar pujara (@cheteshwar1) March 10, 2022
सस्सेक्सने काय म्हटलं?
“एका अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आमच्याकडून खेळणार म्हणून आम्ही आनंदी आहोत. तो संघासाठी काय करु शकतो हे आम्हालाही पहायचे आहे. तो क्लबच्या युवा फलंदाजांसाठी मार्गदर्शक बनू शकतो. ट्रेविस खेळत नसल्याने आम्ही दु:खी आहोत. पण ट्रेविस आणि त्याच्या कुटुंबाला नव्या आनंदासाठी आमच्याकडून शुभेच्छा” असे सस्सेक्सने म्हटलं आहे.