एका चेंडूत 27 धावांची गरज आणि फिल्डिंगसाठी 4 मिनिटं! अक्षर-कुलदीपने कृणाल पांड्याची भेट घेताच घेतली फिरकी
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2025 स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. चार पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे प्लेऑफचं गणित सोपं होताना दिसत आहे. दिल्लीने चौथ्या सामन्यात आरसीबीला पराभूत केलं आणि सामन्यानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावेळी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव कृणाल पांड्याशी बोलत आहेत आणि मुकेश कुमारची खिल्ली उडवत आहेत.

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची विजयी घोडदौड सुरु आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सची चांगली कामगिरी सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6 विकेट ठेवून पराभूत केलं. यासह चार विजय आणि 8 गुण मिळवत दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमधील 24 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले होते. बंगळुरुचं होमग्राऊंड असल्याने त्याचं पारडं जड होतं. पण दिल्लीकडून केएल राहुलने दमदार खेळी करून सामना खेचून आणला. या सामन्यानंतर कर्णधार अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अष्टपैलू कृणाल पांड्याची भेट घेतली. दिल्ली कॅपिटल्सने या चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात अक्षर आणि कुलदीप मुकेश कुमारची फिरकी घेताना दिसत आहेत.
कुलदीप यादवने या चर्चेदरम्यान सांगितलं की, चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी एका चेंडूत 27 धावांची गरज होती. असं असूनही मुकेश कुमारने फिल्डिंग लावण्यासाठी चार मिनिटं घेतली. अक्षर पटेलने सांगितलं की, खेळाडू मुकेशला शिव्या देत होते. चर्चा सुरु असताना कृणाल पांड्याने सांगितलं की, नॉर्मल व्यक्ती असं करू शकत नाही. त्यानंतर लगेचच बोलतो की, मुकेश हँडसम झाला आहे. त्यांच्यातील संपूर्ण संभाषण व्हिडीओत रेकॉर्ड झालं आहे.
Mukesh bhai unique toh hain yaar 😂 pic.twitter.com/DjJYF23qLT
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 11, 2025
दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईने 19 षटकापर्यंत 5 गडी गमवून 143 धावा केल्या होत्या आणि शेवटच्या षटकात 41 धावांची गरज होती. तेव्हा ते षटक टाकण्यासाठी मुकेश कुमार आला. स्ट्राईकला असलेल्या विजय शंकरने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर दोन धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेऊन धोनीला स्ट्राईक दिली. धोनीने चौथ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर एक धाव घेत पुन्हा विजय शंकरला स्ट्राईक दिली. तेव्हा चेन्नईला एक चेंडूत 27 धावांची गरज होती. पण त्यावर फक्त 1 धावा आली आणि दिल्लीने 25 धावांनी विजय मिळवला.