IPL 2021: दुखापतग्रस्त रायडूबद्दल मोठी अपडेट, पत्रकार परिषदेत समोर आली माहिती
मुंबई विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा फलंदाज अंबाती रायडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला सामना मध्येच सोडून तंबूत परतावं लागलं होतं. त्यानंतर तो पुढच्या सामन्यात खेळेल की नाही याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
दुबई : चेन्नईने आयपीएलच्या 14 व्या पर्वाची सुरुवातच विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नईने गतविजेत्या मुंबईचा (MI vs CSK) 20 धावांनी पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. पण या सामन्यात चेन्नईचा अनुभवी फलंदाज अंबाती रायडू (Ambati Rayudu) मात्र दुखापतग्रस्त झाला. नुकताच फलंदाजीला आला असता रायडूला अॅडम मिल्न याचा चेंडू अत्यंत जोरात हाताच्या मनगटावर लागला. त्यामुळे त्याला मध्येच फलंदाजी सोडून तंबूत परतावे लागले. नंतर तो फलंदाजीला आलाच नाही. दरम्यान त्याची दुखापत नेमकी किती होती? यावर आता अपडेट आला असून पुढे तो खेळणार का? हे ही सांगितले गेले आहे.
रायडूसोबत मुख्य गोलंदाज दीपक चाहरलाही (Deepak Chahar) गोलंदाजी करताना थोडा त्रास होत होता. दरम्यान या दोघांबद्दल चेन्नई सुपरकिंग्सचा कोच स्टीफन फ्लेमिंग (Stephen Flaming) याने माहिती दिली आहे. त्याने सामन्यानंतर पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले की,‘रायडूचा एक्स रे ठीक आला आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली होती. फ्रॅक्चर नसल्यामुळे तो पुढील सामन्यात नक्कीच खेळेल. तसेच दीपकलाही पायाला काही त्रास नसून थोडासा क्रॅम्प आल्यामुळे त्याला त्रास होत होता पण तोही आता ठीक आहे.’
धोनीकडून विजयाचं श्रेय 2 खेळाडूंना
आमचा संघ संकटात सापडलेला असताना पहिल्यांदा ऋतुराजने डाव सावरला. सेट झाल्यानंतर त्याने आक्रमण केलं. त्याने खूप सुंदर फलंदाजी केली. पीचवर स्थिरावल्यावर ऋतुराजने आक्रमक फटकेही खेळले. शेवटच्या काही ओव्हरमध्ये ब्राव्होनेही ऋतुराजला उत्तम साथ दिली. दोघांमुळे आम्ही सन्मानजनक धावसंख्या उभा करु शकलो आणि गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केल्याने मुंबईचा पराभव करणं शक्य झालं, असं महेंद्रसिंग धोनी म्हणाला.
दुबईत ऋतु’राज’
ऋतुराजने 58 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 88 धावा चोपल्या, त्याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. 40 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याने मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. मुंबईचे दोन महत्त्वाचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या दोघांवरही गायकवाडने प्रहार केला. मातब्बर गोलंदाजांची गोलंदाजी फोडून काढत गायकवाडने दुबईत दबंगगिरी केली. तर ऋतुराजला ब्राव्होनेही सुंदर साथ दिली. ब्राव्होने 8 चेंडूत 23 धावा फटकावल्या. त्याने लागोपाठ 3 षटकार खेचत सामन्यात रंगत आणली. शेवटच्या हाणामारीच्या षटकात ऋतुराज-ब्राव्हो जोडीने मुंबईची गोलंदाजी फोडून काढली.
हे ही वाचा :
या 2 खेळाडूंमुळे मुंबईचा पराभव करु शकलो, विजयानंतर MS धोनीची प्रतिक्रिया
IPL 2021: विराटचा आणखी एक मोठा निर्णय, यंदाच्या आयपीएलनंतर आरसीबीचं कर्णधारपदही सोडणार
IPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग सामन्यात रोहित का नाही?, पोलार्डने सांगितलं कारण
(CSKs Ambati rayudu injury update no fracture ready to play)