कर्णधार होताच धोनीसमोर सर्वात मोठं आव्हान, ऋतुराजच्या अनुपस्थितीत 7 आकड्याचं गणित जुळवणार का?
आयपीएल 2025 स्पर्धेच्या मध्यात चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांच्या मनात कुठे दु:ख तर कुठे आनंद अशी स्थिती आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. तर महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. त्यामुळे धोनी आणि 7 अंकाचं गणित जुळवावं लागणार आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला आहे. कोपराच्या फ्रॅक्चरमुळे आयपीएल 2025च्या उर्वरित सामन्यांमधून ऋतुराज गायकवाड बाहेर पडला आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी उर्वरित हंगामासाठी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या होमग्राउंडवर होणाऱ्या सामन्याच्या एक दिवस आधीमुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी ही माहिती दिली. “कोपराला फ्रॅक्चर झाल्यामुळे ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर पडला आहे. महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल,” असे फ्लेमिंग यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.महेंद्रसिंह धोनीकडे पुन्हा एकदा कर्णधारपद आल्याने 7 अंकाशी गाठ पडली आहे. धोनी आणि 7 अंकाचं तसं पाहिलं तर जवळचं नातं आहे. नेमकं आता 7 अंकाचं काय झालं ते गुणतालिकेतील गणितातून समजून घ्या.
आयपीएल 2025 स्पर्धेतील गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्सचा संघ नवव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्सने या पर्वात आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला असून 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. अजूनही चेन्नई सुपर किंग्सला साखळी फेरीत एकूण 9 सामने खेळायचे आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर यापैकी 7 सामने जिंकणं भाग आहे. म्हणजेच धोनी आणि 7 अंकाचं गणित पुन्हा एकदा जुळून आलं आहे. आता चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात फक्त 2 गुण असून प्लेऑफमध्ये सुरक्षितपणे स्थान मिळवण्यासाठी 16 गुण आवश्यक आहेत. म्हणजेच 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. 7 सामन्यात विजय मिळवला तर 14 गुणांची कमाई होईल आणि 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल. त्यामुळे धोनीची पुन्हा एकदा 7 अंकाशी गाठ आहे.
2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये जेतेपद मिळवलं आहे. 2022 मध्ये रवींद्र जडेजाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण खराब कामगिरीमुळे धोनीला या पर्वाच्या मध्यात पुन्हा कर्णधारपद स्वीकारावे लागले होते. त्यानंतर 2024 पर्वापूर्वी धोनीने गायकवाडकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली होती. आता 2025 आयपीएल स्पर्धेत पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीकडे कर्णधारपद आलं आहे.