IND vs PAK: पाकने आधीच हार मानली? पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, भारतच सरस
सर्वच जण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतायत. कारण क्रिकेट चाहत्यांना बऱ्याच कालावधीनंतर भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना पाहता येणार आहे.
मुंबई: काही दिवसातच आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धा सुरु होणार आहे. 27 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती मध्ये ही स्पर्धा सुरु होत आहे. सर्वच जण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतायत. कारण क्रिकेट चाहत्यांना बऱ्याच कालावधीनंतर भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना पाहता येणार आहे. आशिया कप आणि त्यानंतर आयसीसी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ या सामन्याची जोरदार तयारी करत आहेत. पण पाकिस्तानला आपल्याच देशातून पाठिंबा मिळत नाहीय. माजी लेग स्पिनर दानिशा कनेरिया (Danish Kaneria) यांनी, या सामन्यात भारताची बाजू वरचढ असल्याचं म्हटलं आहे. भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. पाकिस्तानचा संघ नदरलँड्स विरुद्ध सीरीज खेळतोय. दोन्ही संघ आपआपली तयारी करत आहेत. 28 ऑगस्टला होणाऱ्या सामन्याच्यावेळी भारताची बाजू जास्त मजबूत असेल, असं मत दानिश कनेरियाने व्यक्त केलं.
केएल राहुलच्या फॉर्मवर नजर
पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामने आणि 18 वनडे खेळणाऱ्या दानिश कनेरियाने इंडिया टुडेशी चर्चा केली. “मला झिम्बाब्वे सीरीज मध्ये केएल राहुलचा फॉर्म बघायचा आहे. कारण दुखापतीनंतर तो पुनरागमन करतोय. रोहित शर्मा बद्दलही प्रश्न आहे, कारण तो पाठिच्या दुखण्यातून सावरतोय. पाकिस्तानी संघात नसीम शाह आपल्या दुखापतीमुळे हैराण आहे. शाहीन शाह आफ्रिदीलाही फिटनेसची समस्या आहे. दोन्ही संघांचे काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत” असं दानिश कनेरिया म्हणाले.
म्हणून भारताचं पारडं जड
“अजूनही भारताच पारड जड आहे. ते पुनरागमन करु शकतात. ते चांगलं टी 20 क्रिकेट खेळतायत. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा सामना 60 टक्के भारताच्या बाजूने आहे, तर 40 टक्के पाकिस्तानची बाजू वरचढ आहे. भारताकडे शानदार फिरकी गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा सारखे स्पिनर आहेत. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सारखे गोलंदाज टीम इंडियासाठी कमाल करु शकतात. पाकिस्तानला आपल्या गोलंदाजीकडे लक्ष द्यावे लागेल, कारण शाहीन फिट नसेल, तर मग पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व कोण करणार?” असा सवाल दानिश कनेरिया यांनी उपस्थित केला.
भारत-पाक मध्ये शेवटचा सामना कधी झाला?
याआधी भारत आणि पाकिस्तान मध्ये शेवटचा टी 20 सामना मागच्या वर्षी टी 20 वर्ल्ड कप मध्ये झाला होता. ज्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. पाकिस्तानने 10 विकेटने एकतर्फी विजय मिळवला होता. कुठल्याही वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानकडून झालेला भारताचा हा पहिला पराभव होता. टीम इंडिया त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक्त आहे.