IPL 2021 : ‘बर्थडे बॉय’ ऋषभ पंतसमोर ‘Dhoni Review System’ फेल, स्टम्पची संधीदेखील गमावली
दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवलेल्या या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs CSK) हे संघ आमने सामने होते. अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंच गेला.
DC Vs CSK: IPL 2021 मध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आले. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचा काल 24 वा वाढदिवसदेखील होता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी, ऋषभ पंत मोठा धमाका करू शकला नाही, पण त्याला एका छोट्या डावात दोन वेळा जीवनदान नक्कीच मिळाले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्याविरुद्ध सहाव्या षटकात रिव्ह्यू (Decision Review System) घेतला. त्यात धोनी अपयशी ठरला आणि पंतला या डावात पहिले जीवनदान मिळाले. (‘Dhoni Review System’ failed in front of Rishabh Pant, also lost the opportunity to stump pant)
जोश हेजलवूडने दिल्लीच्या डावात सहावं षटक टाकलं. या षटकातील शेवटचा चेंडू ऋषभ पंतच्या पॅडवर आदळला आणि महेंद्रसिंग धोनीने झेलला. धोनी आणि गोलंदाजाने अपील केले, हे अपील फेटाळत पंचांनी ऋषभला नाबाद घोषित केले. परंतु एमएस धोनीने DRS ची मागणी केली. मात्र, एमएस धोनीचा रिव्हू पूर्णपणे अपयशी ठरला आणि ऋषभ पंत वाचला. चेंडू पंतच्या बॅटला लागलाच नव्हता, तर तो पॅडला लागून धोनीने झेलला होता.
सामन्याच्या 9 व्या षटकात ऋषभ पंतला पुन्हा एकदा जीवदान मिळाले. रवींद्र जाडेजाने एक वाइड बॉल टाकला, ज्यावर ऋषभ पंत पुढे जाऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पंतने चेंडू मिस केला. धोनीने चेंडू झेलून यष्ट्यांवर आदळला (Stumped) आणि यष्टीचितचं अपील केलं. मात्र धोनीने स्टम्पिंग करेपर्यंत पंत क्रीजवर परतला होता. तिसऱ्या पंचांनी पुन्हा एकदा पंतला नाबाद घोषित केले.
दरम्यान, ऋषभ पंत या दुहेरी जीवनाचा फायदा घेऊ शकला नाही आणि अवघ्या 12 चेंडूत 15 धावा करून तो बाद झाला. मात्र, 12 चेंडूंमध्येही पंतने आपली चमक दाखवली आणि एक षटकार, एक चौकारही लगावला. रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पंतने मोठा फटका मारला मात्र मोईन अलीने चेंडू झेलत पंतला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
दिल्लीची चेन्नईवर मात
दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवलेल्या या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs CSK) हे संघ आमने सामने होते. अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंच गेला. पण अखेर दिल्लीने 3 गडी राखून गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या चेन्नईला मात देत सामना जिंकला. सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने गोलंदाजी निवडली होती. जो निर्णय दिल्लीने बरोबर करत चेन्नई संघाला अवघ्या 136 धावांत आटोपलं. दिल्लीकडून अक्षर पटेलने 2 तर आवेश खान, नॉर्खिया आणि आश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. पण सर्वच गोलंदाजनी अतिशय कमी धावा देत चेन्नईला 136 धावांवर रोखलं.
चेन्नईचे सलामीवीर फाफ डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड यांनी संपूर्ण हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे. पण आजच्या सामन्यात दोघंही स्वस्तात तंबूत परतले. संपूर्ण संघात सर्वाधिक धावा अनुभवी खेळाडू अंबाती रायडूने केल्या. त्याने 5 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 55 धावा झळकावल्या. त्याला धोनीने 18 धावांची मदत केली. तर उथाप्पाने देखील 19 धावा केल्या. ज्याच्या जोरावरच चेन्नईचा संघ किमान 136 धावा करुन दिल्लीसमोर 137 धावांचे आव्हान ठेवू शकला.
दिल्लीचा 3 विकेट्सनी विजय
सामन्याची खेळपट्टी गोलंदाजीच्या दृष्टीने उत्तम असल्याने दिल्लीचे बहुतेक फलंदाजही सामन्यात अपयशी ठरले. केवळ शिखर धवनने महत्त्वपूर्ण 39 धावा केल्या. ज्याला सुरुवातीला पृथ्वीने 18 आणि मध्यंतरी पंतने 18 धावांची साथ दिली. पण हे सगळे बाद झाल्यानंतर सामना चेन्नईच्या बाजूने झुकु लागला. पण वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हीटमायरने नाबाद 28 धावा ठोकत सामना दिल्लीच्या बाजूने वळवला. विशेष म्हणजे शेवटच्या 3 चेंडूत 2 धावांची गरज असताना फलंदाजीला आलेल्या रबाडाने चौकार लगावत सामना दिल्लीला 3 विकेट्सनी जिंकून दिला. या रोमहर्षक विजयानंतर दिल्लीच्या हीटमायरने मैदानावर जल्लोष केला.
इतर बातम्या
IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी उत्तम, पण कर्णधार धोनीच्या नावे खराब रेकॉर्ड
IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान
हैद्राबाद संघाची फलंदाजी सर्वात रटाळ, पाहताना झोप लागते, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा हल्लाबोल
(‘Dhoni Review System’ failed in front of Rishabh Pant, also lost the opportunity to stump pant)