Sourav Ganguly: अमित शाहंच्या ‘त्या’ भेटीमुळे सौरव गांगुली मोठा निर्णय घेणार?
Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे
मुंबई: भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या घोषणेला राजीनाम्याशी जोडलं जात आहे. सौरव गांगुली राजीनामा देणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सौरव गांगुलीने आज संध्याकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन या निर्णयाची माहिती दिली. सौरव गांगुलीने नवीन काही तरी सुरु करत असून तुमच्या सगळ्यांची साथ हवी, असं म्हटलं आहे. त्यामुळे सौरव गांगुली राजकारणात प्रवेश तर करणार नाही ना, अशी चर्चा सुरु आहे. मागच्याच महिन्यात मे च्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) कोलकात्यामध्ये आले होते. त्यावेळी सौरव गांगुलीने आपल्या निवासस्थानी त्यांच्यासाठी खास भोजन समांरभ आयोजित केला होता. याच डिनर डिप्लोमसीमुळे सौरव गांगुलीने राजीनामा देणार तर नाही ना? अशी चर्चा आहे. भाजपाकडून सौरव गांगुली यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे.
“I am planning to start something that I feel will probably help a lot of people,” tweets Sourav Ganguly. pic.twitter.com/SGxoPgmTNB
— ANI (@ANI) June 1, 2022
पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्रीपदाचे उमदेवार असतील अशी चर्चा
मागच्यावर्षी पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी सौरव गांगुली भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती. सौरव गांगुली हे भाजपाचे पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्रीपदाचे उमदेवार असतील, असंही बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात त्यावेळी तसं काही घडलं नाही. सौरव गांगुली यांना ह्दयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे सौरव गांगुली राजकारण्याच्या पीचवर येणार नाहीत, हे त्यावेळी स्पष्ट झालं.
भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वाबरोबर चांगले संबंध
सौरव गांगुली आणि भाजपा नेत्यांमधील जवळीक कधीही लपून राहिलेली नाही. सौरव गांगुली यांचे भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांबरोबर सलोख्याचे संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बरोबर त्यांचे चांगले सलोख्याचे नाते आहे. त्यामुळे सौरव गांगुली आणि भाजपा यांची जवळीक सर्वांना माहित आहे. सौरव गांगुलीने आज जी पोस्ट केलीय, त्याचा नेमका अर्थ अजून स्पष्ट झालेला नाही. पण ते राजकारणात प्रवेश करु शकतात, अशी दाट शक्यता आहे.
भाजपाला सौरव गांगुलीकडून नेमकं काय हवं?
भाजपला सौरव गांगुली यांच्या प्रतिमेचा फायदा उचलून पश्चिम बंगालमध्ये आपला जनाधार भक्कम करायचा आहे. सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाला असला, तरी पश्चिम बंगालमध्ये त्याची लोकप्रियता टिकून आहे. त्याला मानणारा मोठा वर्ग आहे. ममता बॅनर्जी सारख्या मोठा जनाधार असलेल्या नेत्यांचा सामना करण्यासाठी भाजपाला अशा चेहऱ्याची आवश्यकता आहे. सौरव गांगुली स्पष्टवक्ता आणि स्वच्छ प्रतिमेचा माणसू आहे. त्यामुळे त्याच्यावर जनताही विश्वासही ठेवले. भाजपाला हेच हवं आहे.